आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर १० धावांनी मात केली. मोक्याच्या क्षणी KKR च्या गोलंदाजांनी केलेलं पुनरागमन आणि अखेरच्या षटकांत सुनिल नारायण व वरुण चक्रवर्तीचा खुबीने वापर करत कोलकाताने सामन्याचं चित्र बदलून टाकलं. चेन्नईकडून शेन वॉटसनने ५० धावांची खेळी केली, मात्र मोक्याच्या क्षणी मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली निराशाजनक कामगिरी चेन्नईला चांगलीच महागात पडली. चेन्नईचा संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
१६८ धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. फाफ डु-प्लेसिस आणि शेन वॉटसनने सुरुवातीच्या षटकांमध्ये काही चांगले फटके खेळले. शिवम मवीने डु-प्लेसिसला माघारी धाडत चेन्नईला पहिला धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या अंबाती रायुडूने शेन वॉटसनला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. ही जोडी चेन्नईला विजयपथावर घेऊन जाणार असं वाटत असतानाच कमलेश नागरकोटीने रायुडूला माघारी धाडलं. दुसरीकडे शेन वॉटसनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, मात्र यानंतर लगेचच तो नारायणच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. वॉटसनने ४० चेंडूत ६ चौकार आणि एक षटकारासह ५० धावा केल्या.
मोक्याच्या क्षणी कोलकाताच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्यामुळे चेन्नईचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. दिनेश कार्तिकने सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांचा सुरेख वापर करत चेन्नईच्या फलंदाजांवर दबाव आणला. महेंद्रसिंह धोनीने हा दबाव झुगारत फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण यात त्याला अपयश आलं. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो ११ धावा काढून माघारी परतला. त्याच्या सोबत असलेला सॅम करनही आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना माघारी परतला. यानंतर चेन्नईचे फलंदाज सामन्यात पुनरागमन करु शकले नाहीत. कोलकात्याकडून शिवम मवी, वरुण चक्रवर्ती, नागरकोटी, नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
त्याआधी,सलामीवीर राहुल त्रिपाठीच्या धडाकेबाज ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईविरुद्ध सामन्यात १६७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या KKR ने डावाची चांगली सुरुवात केली होती. परंतू शुबमन गिल माघारी परतला आणि कोलकात्याच्या डावाची घसरगुंडी उडाली. मधल्या फळीतला एकही फलंदाज राहुल त्रिपाठीसोबत महत्वपूर्ण भागीदारी करु शकला नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनीही मधल्या षटकांमध्ये चांगलं पुनरागमन केलं.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचा निर्णय कोलकात्याच्या फलंदाजांनी योग्य ठरवला. सुनिल नारायणऐवजी सलामीला बढती मिळालेला राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ही जोडी मैदानावर स्थिरावणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने शुबमन गिलला धोनीकरवी झेलबाद केलं. यानंतर नितीश राणाही कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. सुनिल नारायणने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन राहुल त्रिपाठीला थोडीफार साथ दिली. परंतू कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर तो देखील १७ धावा काढून बाद झाला.
KKR चे इतर फलंदाज माघारी परतत असतानाही राहुल त्रिपाठीने एक बाजू लावून धरली. चेन्नईच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत राहुलने आपलं अर्धशतक झळकावलं. अखेरच्या षटकांत भरवशाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत असतानाही त्रिपाठी एक बाजू सांभाळत मैदानावर पाय रोवून उभा राहिला. मधल्या षटकांमध्ये राहुलने फटकेबाजी करत कोलकात्याला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. अखेरच्या षटकांत ब्राव्होच्या गोलंदाजीवर तो देखील शेन वॉटसनकडे झेल देऊन माघारी परतला. ५१ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने राहुलने ८१ धावा केल्या. यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी KKR ला १६७ धावांचा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून ब्राव्होने ३ तर शार्दुल ठाकूर, सॅम करन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.