रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत क्षेत्ररक्षण करताना अनवधानाने लाळेचा वापर केला. मात्र कोहलीने त्याची चूक लगेचच मान्य केली.
पृथ्वी शॉ याने नवदीप सैनीच्या डावातील तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारलेला फटका कोहलीने अडवला. मात्र चेंडू हातात घेतल्यावर लगेचच कोहलीने त्याला लाळ लावली. करोना काळातील नव्या नियमांप्रमाणे चेंडूला लाळ लावण्यास मज्जाव आहे. मात्र लक्षात येताच कोहलीने चूक मान्यदेखील केली.
गेल्या आठवडय़ात राजस्थान रॉयल्सचा रॉबिन उथप्पादेखील कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत क्षेत्ररक्षण करताना चेंडूला लाळ लावताना दिसला होता. चेंडूला लाळ लावण्याच्या नियमाप्रमाणे एका डावात दोन वेळा तंबी देण्यात येणार आहे. मात्र जर पुन्हा तेच घडले तर फलंदाजी करणाऱ्याच्या खात्यात पाच धावा जमा होणार आहेत.