आयपीएल 2021च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. शुक्रवारी वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर 6 गडी राखून सहज विजय नोंदवला. चेन्नईकडून 4 षटकात 13 धावा देत 4 बळी घेणाऱ्या दीपक चहरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या कामगिरीसह चहरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

36 बळींची नोंद

दीपक चहरने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 3.20च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने एक निर्धाव षटकही टाकले. 2017मधील पदार्पणानंतर चहर आयपीएलमधील पहिल्या 6 षटकांत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्यामुळे दीपकच्या नावावर 36 बळींची नोंद झाली आहे. या विक्रमात दुसरा क्रमांक उमेश यादवचा आहे, त्याने आयपीएलच्या पहिल्या 6 षटकांत 25 बळी घेतले आहेत.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात दीपक चहरने मयंक अग्रवाल (0), ख्रिस गेल (10 धावा), दीपक हुडा (10 धावा) आणि निकोलस पूरन (0) यांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. 2017मध्ये पदार्पणानंतर सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर माघारी धाडणारा तो गोलंदाज ठरला आहे. त्याने 14 फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नाही. या प्रकरणातही उमेश यादव दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 10 फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे.

आयपीएलमधील दीपक चहरचे हे सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन आहे. चहरची मागील सर्वोत्कृष्ट कामगिरी 2018मध्ये हैदराबादविरुद्ध 15 धावांत 3 बळी अशी होती.

असा रंगला सामना…

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला. या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  पहिल्या सत्रात पंजाबच्या फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची भेदक गोलंदाजी आणि इतर खेळाडूंनी केलेल्या दमदार क्षेत्ररक्षणामुळे पंजाबला 20 षटकात 8 बाद 106 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात चेन्नईने हे आव्हान 15.4 षटकांतच गाठले आणि यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. महेंद्रसिंह धोनीचा हा चेन्नईसाठी 200वा सामना होता, त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी अजूनच खास ठरला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 csk pacer deepak chahar records his best ever bowling figure in ipl adn