IPL 2025 CSK Sign New Player: आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. ११ सामन्यांत ९ पराभवांसह संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. यासह संघ यंदाच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. पण आता संघाते फक्त ३ सामने शिल्लक आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा एक युवा खेळाडू दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूच्या बदलीची घोषणाही केली आहे. सीएसके संघाने अशा खेळाडूचा संघात समावेश केला आहे, ज्याने २८ चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज वंश बेदी दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. डाव्या घोट्यातील लिगामेंट फाटल्यामुळे वंश बेदीला संघ सोडावा लागला आहे. वंश बेदीला आरसीबीविरूद्ध सामन्यात खेळण्याची संधी मिळणार होती. पण दुखापतीमुळे त्याच्या जागी दीपक हुडाचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. सामन्यापूर्वीच्या संघाच्या प्लेईंग इलेव्हन शीटचा फोटोही व्हायरल होत होता.
वंश बेदीला यंदाच्या मोसमात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता दुखापतीमुळे तो उर्वरित सामन्यांमधूनही बाहेर झाला आहे. त्याच्या जागी चेन्नई सुपर किंग्जने गुजरातकडून खेळणारा यष्टीरक्षक-फलंदाज उर्विल पटेलला त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. उर्विलने २०२४-२५ च्या भारतातील देशांतर्गत टी-२० स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
चेन्नई सुपर किंग्सने ताफ्यात सामील केलेला उर्विल पटेल कोण आहे?
उर्विल पटेलने २०२४-२५ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इंदूरमध्ये त्रिपुराविरुद्ध २८ चेंडूत शतक झळकावले आणि टी-२० मध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज ठरला. पण त्याआधी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात उर्विल पटेल अनसोल्ड राहिला होता. तो भारतासाठी लिस्ट ए मध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू देखील आहे. २०२३ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ४१ चेंडूत शतक झळकावले होते.
उर्विल पटेलने आतापर्यंत ४७ टी-२० सामन्यांमध्ये २६ च्या सरासरीने ११६२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४ अर्धशतकं आणि २ शतकांचा समावेश आहे. त्याने १७०.३८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. उर्विल पटेल सीएसकेने हंगामाच्या मध्यात झालेल्या चाचण्यांमध्ये भाग घेतलेल्या तीन खेळाडूंपैकी एक होता. या चाचण्या २७ आणि २८ एप्रिल रोजी चेन्नई येथे झाल्या होत्या. यापूर्वी, आयुष म्हात्रे आणि उर्विल पटेल यांना एकत्रितपणे ट्रायलसाठी बोलावण्यात आले होते. पण कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या जागी उर्विलला वगळून आयुषची निवड करण्यात आली.