IPL 2025 Schedule News: आयपीएल २०२५ च्या सीझनला येत्या २२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. सर्वच जण आयपीएलसाठी उत्सुक झाले आहे. आयपीएल २०२५ पूर्वी महालिलाव झाला, त्यामुळे सर्व संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत. तर ५ संघांचे कर्णधार बदलले आहेत. ज्यामध्ये ९ संघांचे कर्णधार भारतीय आहेत, तर एका संघाचा कर्णधार विदेशी आहे. पण यापूर्वी बीसीसीआयला आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२५ मधील सलामीचा सामना गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर आयपीएलच्या वेळापत्रकानुसार ६ एप्रिलला होणाऱ्या सामन्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ६ एप्रिलला होणारा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. लखनौ सुपर जायंट्स यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार होता.

आयपीएलच्या वेळापत्रकात का होणार बदल?

पण या सामन्यादिवशी म्हणजेच ६ एप्रिलला रामनवमीचा सण आहे. या कारणास्तव, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) सामन्याच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली आहे. कोलकाता पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर CAB ने हे पाऊल उचलले आहे. रामनवमी साजरी होत असल्याने सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था त्यांना करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, CAB चे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली म्हणाले, “आम्ही प्रशासन आणि पोलिसांशी बरीच चर्चा केली, यादरम्यान त्यांनी स्पष्ट केले की उत्सवामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवणे शक्य होणार नाही. आम्ही बीसीसीआयकडे सामन्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे आणि येत्या काही दिवसांत याबद्दल निर्णय होईल अशी आशा आहे.”

वेळापत्रक आधीच निश्चित झाले असल्याने सामन्याच्या वेळेत बदल करणे कठीण होऊ शकते, असे संकेत बीसीसीआयच्या सूत्रांनी दिले आहेत. त्याऐवजी हा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवता येईल का, यावर विचार केला जात आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘सीएबीकडून औपचारिक विनंती करण्यात आली आहे आणि आम्ही त्यावर मार्ग शोधण्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत.’ बीसीसीआय यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित संघ आणि लॉजिस्टिक टीमशी चर्चा करत आहे.

गेल्या मोसमात, रामनवमीच्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामना देखील पुन्हा शेड्यूल करण्यात आला होता. २०२५ च्या आयपीएल हंगामाचा सुरूवातीचा सामनाही कोलकातामधील ईडन गार्डन्समध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने भव्य ओपनिंग सेरेमनीचं आयोजन केलं आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 kkr vs lsg match to be rescheduled due to security issues bdg