IPL 2025 Will Australian Players Play in Remainder of IPL: आयपीएल २०२५ च्या अचानक स्थगितीनंतर बीसीसीसीआयने पुन्हा एकदा यंदाच्या आयपीएलचं नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार येत्या १७ मे पासून सामने परत सुरू होणार आहेत. पण याचदरम्यान ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने WTC फायनलसाठीच्या संघात १५ खेळाडूंचा समावेश केला आहे. यादरम्यान आता आयपीएल खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पुन्हा येणार की नाही, यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आपलं मत मांडलं आहे.
११ जूनपासून लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजला रवाना होईल, जिथे त्यांना २५ जूनपासून ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही महत्त्वाच्या मोहिमांसाठी, १५ सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे असणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या १५ सदस्यीय संघात अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन ६ महिन्यांनी परतला आहे. तर दुखापतीमुळे बाहेर असलेला पॅट कमिन्सचंही संघात पुनरागमन झालं आहे. भारताविरूद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील ऑस्ट्रेलियाच्या फायनल संघात संधी मिळाली आहे.
आयपीएल २०२५ मध्ये खेळणार का ऑस्ट्रेलियाचे खेळाडू?
WTC फायनल आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा झाल्यानंतर, आता मोठा प्रश्न असणारे की, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार की नाही? कारण WTC फायनल ११ जूनला सुरू होत आहे तर IPL २०२५ चा अंतिम सामना ३ जूनला असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील १५ खेळाडूंपैकी काही खेळाडू हे आयपीएल २०२५ मध्ये खेळत आहेत. ज्यामध्ये पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड आणि जोश इंग्लिस हे खेळाडू आहेत.
दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या राष्ट्रीय संघाचे खेळाडू आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही हा निर्णय सर्वस्वी खेळाडूंवर सोडला आहे. खेळाडूंचा जो निर्णय असेल तो बोर्डाला मान्य असेल, असे बोर्डाने म्हटले. “शनिवारी आयपीएल पुन्हा सुरू होण्याची घोषणा झाल्यानंतर, खेळाडूंनी पुन्हा भारतात परतायचे की नाही हा निर्णय वैयक्तिक खेळाडूंचा असेल, ज्यामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड त्यांना पाठिंबा देईल. उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या खेळाडूंसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तयारीकरता टीम मॅनेजमेंट काम करेल,” असे सीएच्या प्रवक्त्याने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
WTC फायनलकरता ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, स्कॉट बोलँड, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, मॅथ्यू कुनहेमन, नॅथन लायन आणि ब्यू वेबस्टर.