इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या आधीच आता चेन्नई सुपर किंग्ज या संघाला एक मोठा फटका बसला आहे. त्यांचा एक स्टार खेळाडू पहिली मॅच खेळू शकणार नाही, असं दिसतंय. हा महत्त्वाचा खेळाडू आहे मोईन अली.


चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यात मोईन अलीशिवायच खेळावी लागणार अशी चिन्हे आता दिसत आहेत. कारण २६ मार्चला मुंबईत सुरू होणाऱ्या टी-२० सामन्यासाठी मोईन अलीला अजूनही व्हिसा मिळालेला नाही. आयपीएल २०२२ चा पहिला सामना शनिवारी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतवर्षीचा विजेता कोलकत्ता नाईट रायडर्स या दोघांच्यात खेळला जाईल.

हेही वाचा – IPL 2022 | पहिल्याच दिवशी कोलकात्याशी भिडणार, धोनीची जादू यावेळीही कायम राहणार ? जाणून घ्या चेन्नईचा प्लेइंग इलेव्हन


चेन्नई सुपर किंग्जचे अध्यक्ष काशी विश्वनाथन यांनी सांगितलं की, हे तर फिक्स आहे की मोईन अली पहिला सामना खेळू शकणार नाहीत. त्याला अजून व्हिसा मिळालेला नाही. आम्ही आणि भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दोन दिवसात ही समस्या सुटेल अशी आशा आहे.


त्यांनी पुढे सांगितलं की, मोईन अली अजूनपर्यंत इथं येऊ शकला नाही ही निराशाजनक गोष्ट आहे. पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंसाठी ठरवून दिलेल्या प्रक्रियांचं पालन केलं जातं. हेच उशीर लागण्यामागचं कारण असावं. मोईनचे आजोबा पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भागातून इंग्लंडमध्ये गेले होते. पण मोईनचा जन्म मात्र इंग्लंडचाच आहे आणि तो बऱ्याचदा भारतात येत असतो. विश्वनाथन म्हणाले की मोईनला आयपीएल खेळण्यापूर्वी तीन दिवस विलगीकरणात राहावं लागेल. त्यामुळे त्याला उद्या जरी व्हिसा मिळाला तरीही त्याला पहिली मॅच खेळता येणार नाही.