क्रिकेट चाहत्यांना IPLचे वेध लागले असताना एक विचित्र गोष्ट घडली. चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना याने अचानक स्पर्धेतून माघार घेतली आणि तो भारतात परतला. सुरूवातीला त्याच्या या माघारीमागे वैयक्तिक कारण आहे असं सांगितलं जात होतं. पठाणकोटमध्ये त्याच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला आणि करोनाची भीती अशा दोन कारणांचा त्याच्या माघारीशी संबंध जोडला गेला होता. पण आता मात्र रैना प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.
सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेण्याच्या मागे त्याच्यात आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यात झालेला वाद कारणीभूत असल्याचे वृत्त आऊटलूकने दिले आहे. संपूर्ण IPL बायो-बबलमध्ये राहणे रैनाला थोडे भीतीदायक वाटत होते. त्याला धोनीली देण्यात आलेली किंवा त्याच्या रूमसारखीच बाल्कनीवाली रूम वास्तव्यास हवी होती. धोनीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि थेट स्पर्धेतून माघार घेतली असं सांगितलं जातं आहे.
रैना माघार प्रकरणावर CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी रोखठोक मत व्यक्त केले. “रैनाचं असं तडकाफडकी माघार घेणं साऱ्यांसाठी धक्कादायक आहे, पण संघाचे खेळाडू या धक्क्यातून लवकरच सावरतील. यशस्वी झाल्यावर काही लोकांच्या डोक्यात खूपच हवा जाते, त्यातला हा प्रकार आहे. पण संघातील सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. धोनी सारं काही सांभाळून घेऊ शकतो. प्रत्येक क्रिकेटपटू हा आपल्या संघाचं नेतृत्व करत असतो. चेन्नईचा संघ हा एका कुटुंबाप्रमाणे आहे आणि संघातील ज्येष्ठ खेळाडूही एकमेकांशी जुळवून घेतलं आहे. अजून तरी IPLचा हंगाम सुरू झालेला नाही. पण लवकरच रैनाला समजेल की त्याने स्वत:चे किती मोठे आर्थिक नुकसान केले आहे”, असेही श्रीनिवासन म्हणाले.