आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला युएईत सुरुवात होणार आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाची स्पर्धा युएईत आयोजित करण्यात आलेली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामांचा विचार केला असता RCB च्या संघाची कामगिरी ही फारशी चांगली राहिलेली नाही. काही अपवाद वगळता प्रत्येक हंगामात हा संघ तळाशी असतो. अनेक मान्यवर खेळाडू आणि तज्ज्ञांच्या मते RCB चा संघ हा विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्सवर अवलंबून आहे. परंतू संघातील महत्वाचा गोलंदाज उमेश यादवने ही गोष्ट नाकारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – IPL 2020 : ICC एलिट पॅनलमधील ४ पंच करणार स्पर्धेत काम, भारतीय पंचांचाही समावेश

“अनेकांचं असं म्हणणं आहे की आमचा संघ हा विराट आणि डिव्हीलियर्सवर अवलंबून आहे. असं असतं तर मग इतर खेळाडूंना खेळण्याची गरजच काय आहे.?? प्रत्येक खेळाडूचं संघात योगदान असतं. एबी आणि विराट हे इतरांपेक्षा जास्त योगदान देतात, इतपर्यंत ठीक आहे. पण ते देखील त्यांच्यापरीने संघाला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत जे संघासाठी चांगलंच आहे.” उमेश इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

करोनामुळे यंदा निर्माण झालेली परिस्थिती पाहता आयपीएलच्या सामन्यांना यंदा प्रेक्षकांना उपस्थिती लावता येणार नाहीये. याचा खेळाडूंच्या कामगिरीवर काही परिणाम होईल का असं विचारलं असता उमेश म्हणाला, “रणजी सामन्यात आम्ही प्रेक्षकांविना खेळंणं काय असतं हे अनुभवलं आहे. त्यामुळे प्रेक्षक सामना पहायला आले नाहीत याचा माझ्यावर काही परिणाम होईल असं वाटत नाही. मी रणजी सामन्यात अशी परिस्थीती अनुभवली आहे.” त्यामुळे यंदा RCB चा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal challengers bangalore dont rely only on virat kohli and ab de villiers says umesh yadav psd