Tim Seifert To Replace Jacob Bethell In RCB: आयपीएल २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील काही शेवटचे सामने शिल्लक आहेत. लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या ४ संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान प्लेऑफच्या सामन्यांना सुरूवात होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाज जेकब बेथेल आयपीएल २०२५ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी टीम सेफर्टचा संघात समावेश करण्यात आला आहे. बेथेल २४ मे रोजी आपला शेवटचा सामना खेळून इंग्लंडला जाऊ शकतो. त्यानंतर तो इंग्लंडकडून खेळणार आहे.
टीम सेफर्ट हा न्यूझीलंड संघातील विस्फोटक फलंदाज आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला २ कोटी मोजून आपल्या संघात स्थान दिलं आहे. सेफर्टच्या टी –२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला आतापर्यंत ६६ टी –२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १५४० धावा केल्या आहेत. सेफर्ट सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळत आहे. त्याचा संघ स्पर्धेत टिकून राहतो की नाही, यावर तो भारत आयपीएल खेळण्यासाठी येणार की नाही, हे ठरणार आहे.
सेफर्ट भारतात केव्हा येणार?
आयपीएलने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, तो २४ मे पासून होणाऱ्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. तो पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत कराची किंग्जकडून खेळत आहे. आज कराची किंग्ज संघाचा सामना लाहोर कलंदर्स संघाविरुद्ध होणार आहे.
तर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे. याचा अर्थ असा की, तो लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणाऱ्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत जोडला जाऊ शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्लेऑफमध्ये प्रवेश
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाने ८ सामने जिंकले आहेत. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.