हैदराबाद आणि राजस्थान या दोन ऑस्ट्रेलियन कर्णधारांच्या नेतृत्वाखालील संघात डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीरकारली. हैदराबादच्या संघाकडून जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर ही तगडी जोडी सलामीसाठी आली, पण स्टीव्ह स्मिथने आपले सर्वोत्तम २ खेळाडूंना गोलंदाजी दिली. जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाल या दोघांनी डावाच्या सुरूवातीला ४ षटकांत बेअरस्टो-वॉर्नरला जोडीला केवळ १३ धावाच करून दिल्या होत्या. त्यामुळे पाचव्या षटकात गोलंदाजीस आलेल्या कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायच्या उद्देशाने बेअरस्टो फटकेबाजीला सुरूवात केली पण एक षटकार लगावल्यानंतर लगेचच तो झेलबाद झाला. संजू सॅमसनने त्याचा झेल टिपला.

गेल्या काही सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. त्यानुसार नव्या दमाच्या कार्तिक त्यागीला त्याने १ षटकारदेखील खेचला, पण डावाच्या पाचव्या षटकात चौथ्या चेंडूवर बेअरस्टोने हवाई फटका खेळला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने अतिशय वेगाने जमिनीच्या दिशेने जात होता, पण तेवढ्यात संजू सॅमसनने झेप घेत भन्नाट झेल टिपला. त्याचसोबत संजू सॅमसनसाठी आणखी एका गोष्टीसाठी सामना खास ठरला. या त्याच्या IPL कारकिर्दीतील १००वा सामना ठरला. IPL ही स्पर्धा खूपच आव्हानात्मक आहे. एक-दोन सामन्यात खराब कामगिरी केल्यास लगेच खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला जातो अशा या लोकप्रिय स्पर्धेत संजू सॅमसनने १०० सामन्यांचा मैलाचा दगड पार केला.

राजस्थानच्या संघात बेन स्टोक्सचं पुनरागमन

राजस्थानच्या संघात ३ बदल करण्यात आले. दीर्घ विश्रांतीनंतर बेन स्टोक्स संघात आला. त्याच्यासोबतच रियान पराग आणि रॉबिन उथप्पालाही संघात स्थान मिळालं. यशस्वी जैस्वाल, अँड्र्यू टाय आणि महिपाल लोमरोर या तिघांना संघाबाहेर करण्यात आलं. हैदराबादच्या संघानेही काश्मीरचा १८ वर्षीय अब्दुल समाद याला संघाबाहेर केलं आणि त्याच्या जागी विजय शंकरला संधी दिली.