ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन हा एक प्रतिभावंत खेळाडू आहे. आधी राजस्थान आणि नंतर बंगळुरू संघातून खेळल्यानंतर २०१८मध्ये तो CSKमध्ये दाखल झाला. CSKकडून खेळताना त्याने २ वर्षात ३२ सामने खेळले. त्यात त्याने १३०च्या स्ट्राइक रेटने ९५०हून अधिक धावा केल्या. तसेच २ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली. धोनीने सातत्याने दाखवलेला विश्वास यामुळेच वॉटसनला संघात आपले स्थान निर्णाण करता आले आणि चांगली कामगिरी करता आली असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर आता वॉटसनने पुन्हा धोनीची स्तुती केली आहे.
“२०१८ला आम्ही विजेतेपद मिळवलं. केवळ अंतिम सामनाच नव्हे, तर तो संपूर्ण हंगामच माझ्यासाठी सर्वोत्तम होता. पण गेल्या वर्षी माझ्या कामगिरीतील चढउतार समजून घेऊनही CSKने माझ्यावर विश्वास दाखवला. मी स्पर्धेत फारसा चांगला खेळत नव्हतो. पण काही सामन्यांनंतर हैदराबादविरूद्ध मला सूर गवसला. दुसऱ्या कोणत्याही संघात मला बाहेर बसवलं असतं, या संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दर्शवला. मी नक्कीच चांगली कामगिरी करेन असा त्यांना विश्वास होता, म्हणूनच मला संघाबाहेर करण्यात आलं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारा माणूसच अशाप्रकारे इतरांवर विश्वास दाखवू शकतो आणि खेळाडूंकडून चांगला खेळ खेळून घेऊ शकतो”, असं वॉटसन एका मुलाखतीत बोलताना म्हणाला.
“CSKच्या संघ व्यवस्थापनाला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याविरोधात खेळत असतानाही मला खूप मजा यायची. मी राजस्थानकडून खेळायचो तेव्हाही मला धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग यांचा हेवा वाटायचा. त्यांच्या संघ उभारणीच्या पद्धतीचं खूप अप्रूप असायचं. त्यामुळे CSKमधून खेळायला मिळणं आणि त्यांच्या निर्णयप्रक्रियेचा भाग असणं हे माझ्यासाठी खूप खास ठरलं”, असंही वॉटसनने सांगितलं.