Virender Sehwag Reaction On Digvesh Rathi Ban: आयपीएल २०२५ स्पर्धेत दिग्वेश राठी हा गोलंदाज तुफान चर्चेत राहिला. ज्या ज्या फलंदाजांना त्याने बाद केलं, त्या फलंदाजांची नावं त्याने आपल्या कथित नोटबुकमध्ये लिहून ठेवली आहेत. त्याच्या नोटबुक सेलिब्रेशनमुळे त्याला दंड भरावा लागला, एक सामना बाहेर बसावं लागलं. पण, त्याने आपल्या सेलिब्रेशनची पद्धत बदलली नाही. फलंदाजाने शतक झळकावल्यानंतर तो हवं तसं सेलिब्रेशन करू शकतो. मग गोलंदाज का नाही? त्यामुळे दिग्वेश राठीने काही माघार घेतली नाही. अनेकांनी त्याच्यावर टीका केली. तर काही खेळाडूंनी त्याला समर्थन दिलं. ज्यात आता माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचंही नाव जोडलं गेलं आहे.

दिग्वेश राठीवर दोनदा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर तिसऱ्यांदा एका सामन्यांची बंदी घालण्यात आली. यावर वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकबझवर बोलताना तो म्हणाला, ” बंदी घालणं ही खूप कठोर शिक्षा होती. तो पहिल्यांदाच आयपीएल खेळत आहे. एमएम धोनी एकदा मैदानात आला होता, त्याच्यावर बंदी घातली गेली नव्हती. विराटने अनेकदा पंचांशी हुज्जत घातली आहे, त्याच्यावर बंदी घातली गेली नव्हती. दिग्वेशलाही माफ करता आलं असतं.

वीरेंद्र सेहवागने हे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. काहींच्या मते, युवा खेळाडूंसाठी वेगळा न्याय आणि अनुभवी खेळाडूंना सूट दिली जाते.

जितेश शर्माला धावबाद केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

नेहमी आपल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत असणारा दिग्वेश राठी यावेळी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात दिग्वेश राठीने नॉन स्ट्राईकला असलेल्या जितेश शर्माला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्णधार ऋषभ पंतने ही अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्पिरीट ऑफ क्रिकेटची चर्चा रंगली आहे. पण, याच गोष्टीवरून प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हर्षा भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ” जर पंचांना वाटत असेल की, फलंदाज क्रीझच्या आत आहे तर अंपायरने आऊट देणं योग्य आहे. पण नेहमी स्पिरीट ऑफ क्रिकेटचा उल्लेख करणं चुकीचं आहे. खेळाचे काही नियम आहेत ना.” या ट्विटर देखील नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.