Who Is Harsh Dubey: आयपीएल २०२५ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी फलंदाजीतील अनेक रेकॉर्डस् मोडून काढले. सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा रेकॉर्ड हा सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. मात्र, हैदराबादचा संघ गोलंदाजीत मागे पडला. या संघात वेगवान गोलंदाज होते. पण असा फिरकी गोलंदाज नव्हता जो मधल्या षटकांमध्ये गोलंदाजीला येऊन विकेट्स काढून देईल. शेवटच्या काही सामन्यांमध्ये विदर्भाचा फिरकीपटू हर्ष दुबेला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पण हर्ष दुबे आहे तरी कोण? कसा आहे त्याचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात हैदराबादने २७८ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांनीही दमदार सुरूवात केली. दरम्यान मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना हर्ष दुबेने एकाच षटकात रिंकू सिंग आणि आंद्रे रसेलला बाद करत सामना हैदराबादच्या बाजूने वळवला. रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल हे दोघेही फलंदाज आपल्या फटकेबाजीसाठी ओळखले जातात. त्यामुळे ही जोडी जर मैदानावर टिकून राहिली असती, तर हैदराबादच्या अडचणीत वाढ झाली असती. मात्र, डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेने लागोपाठ २ चेंडूंवर दोघांनाही बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर त्याने रमनदीप सिंगची दांडी गुल केली.

कोण आहे हर्ष दुबे?

हर्ष दुबे हा २२ वर्षीय गोलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. त्याला २०२२ मध्ये विदर्भ संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. कमी सामन्यांमध्ये या गोलंदाजाने आपली छाप सोडली आहे. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १८ सामन्यांमध्ये १९.८८ च्या सरासरीने ९७ गडी बाद केले आहेत.

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा हर्ष दुबेच्या नावावर आहे. विदर्भ संघाकडून खेळताना त्याने २०२४–२५ हंगामात ६९ गडी बाद केले होते. यासह त्याने आशुतोष अमनचा सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला होता. मुख्य बाब म्हणजे, इतक्या कमी कालावधीत त्याने ७ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

आयपीएल स्पर्धेत मिळाली संधी

हर्ष दुबेने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात आपलं नाव नोंदवलं होतं. पण तो अन्सोल्ड राहिला होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघातील गोलंदाज आर स्मरण दुखापतग्रस्त झाल्यानंतर, त्याच्या जागी हर्ष दुबेचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. या संधीचा फायदा घेत त्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.