नवी दिल्ली : कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा टाकसाळे आणि हिमांशू जोडीने एका रोमांचक लढतीत मंगळवारी मिश्र सांघिक गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दरम्यान, ट्रॅप प्रकारात भारताचा विनय प्रताप चंद्रावत कांस्यपदकाचा मानकरी ठरला. भारताने आतापर्यंत २३ पदकांसह पदकतालिकेत अग्रस्थान कायम राखले आहे.

एअर रायफलच्या मिश्र सांघिक प्रकारात ईशा-हिमांशूने भारताच्याच शांभवी-प्रणव जोडीचा ९-१५ अशा पिछाडीनंतर १७-१५ असा पराभव करून सोनेरी यश मिळविले. दोन्ही जोड्यांकडून सर्वोत्तम प्रयत्न केले गेले. विशेष म्हणजे या सुवर्ण लढतीत एकूण ६४ फैरींमधून केवळ पाच फैरींमध्ये १० पेक्षा कमी गुण नोंदवले गेले. वार्वरा कार्डाकोवा आणि कामिल नुरियखमेतोव्ह यांनी मारिया क्रुग्लोवा आणि टिमोफेई अलेनिकोव जोडीला १७-९ असे सहज पराभूत करून कांस्यपदक मिळवले.

ट्रॅप स्पर्धा प्रकारात क्रोएशियाच्या २० वर्षीय टोनी गुडेलजने ४४ यशस्वी लक्ष्यांसह देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पात्रता फेरीत आघाडीवर राहिलेला स्पेनचा इसाक हर्नाडेझ ४१ यशस्वी लक्ष्यांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. भारताच्या चंद्रावतने ३४ लक्ष्यांसह कांस्यपदक मिळवले. मुलींच्या विभागात चेक प्रजासत्ताकच्या ली कुसेरोव्ह (४१) हिने सुवर्ण, तर इटलीच्या सोफिया गोरीने (३७) रौप्य आणि केसेनिया सामोफालोवाने (३०) कांस्यपदक मिळवले.

महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रिसिजन टप्प्यात, भारताच्या तेजस्वानीने २८८ गुणांसह आघाडी घेतली. ती इटलीची ॲलेसांद्रा फेट (२८७) आणि व्हिक्टोरिया खोलोडनाया (२८६) यांच्या पुढे राहिली. भारताची नाम्या कपूर (२८४), अलेक्झांड्रा तिखोनोवा (२८३) आणि रिया शिरीष थट्टे (२८१) या अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर होत्या. रॅपिड फायर प्रकार बुधवारी होईल. त्यानंतर अव्वल सहा नेमबाज अंतिम फेरीत प्रवेश करतील. पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये भारताचा राघव वर्मा २९० गुणांसह प्रिसिजन टप्प्यात आघाडीवर आहे. अन्य एक भारतीय मुकेश नेलावल्ली (२८९) त्याच्या मागे आहे. जॉर्जी तारासोव्ह २८५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.