एपी, न्यूयॉर्क

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इटलीच्या यानिक सिन्नेरने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. सिन्नेरने अंतिम सामन्यात १२व्या मानांकित फ्रिट्झवर ६-३, ६-४, ७-५ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. फ्रिट्झच्या पराभवामुळे अमेरिकन टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठीची अमेरिकन खेळाडूची प्रतीक्षा अजून लांबली आहे.

अँडी रॉडिकने अमेरिकेचा अखेरचा खेळाडू होता, ज्याने या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद मिळवले. रॉडिकने २००३ मध्ये हे जेतेपद पटकावले होते. फ्रिट्झ प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. सिन्नेरसमोर फ्रिट्झला अंतिम लढतीत कामगिरी उंचावता आली नाही. सिन्नेरने सामन्याच्या सुरुवातीचे पहिले दोन सेट जिंकत आघाडी घेतली. फ्रिट्झने तिसऱ्या सेटमध्ये सिन्नेरसमोर आव्हान उपस्थित केले. एक वेळ सेट ३-३ अशा बरोबरीत होता. मात्र, सिन्नेरने आपला खेळ उंचावत पुनरागमन करताना सेट जिंकत सामन्यातही विजय मिळवला.

हेही वाचा >>> Saina Nehwal: ऑलिम्पिक पदक गिफ्ट मिळालं म्हणणाऱ्यांवर सायना नेहवालचा संताप; म्हणाली, “आधी ऑलिम्पिकसाठी…”

अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकन खेळाडू असणे अविश्वसनीय आहे. मला चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळाला. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. -टेलर फ्रिट्झ

गेल्या काही काळात आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला आहे. त्यामुळे माझ्यासाठी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद हे महत्त्वपूर्ण आहे. – यानिक सिन्नेर

 इटलीच्या यानिक सिन्नेरने प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

सिन्नेरच्या कारकीर्दीतील हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते.