पुणे :महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेचा पुढील हंगाम अधिक भव्य स्वरूपात होईल असे सूतोवाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी केले.

नुकत्याच झालेल्या महिला ट्वेन्टी-२० चॅलेंजच्या चौथ्या हंगामाचे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाजने जेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या चार सामन्यांत परदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडू, तसेच अनुभवी आणि युवा भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे शनिवारी पुणे येथे झालेल्या सुपरनोव्हाज आणि व्हेलोसिटी यांच्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी पुढील वर्षी महिला ‘आयपीएल’ सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर शाह यांनी पुढील हंगामात ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपाची होईल, असे ‘ट्वीट’ केले.

‘‘महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेमधील खेळाचा दर्जा हा सर्वोत्तम होता. भारतीय खेळाडू जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या खांद्याला खांदा लाऊन खेळताना दिसल्या. त्यामुळे महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल असून पुढील हंगामात ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात होईल,’’ असे शाह म्हणाले. अंतिम सामन्यावेळी शाह आणि ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली हे स्टेडियममध्ये उपस्थित होते. यंदाच्या महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेत तीन संघांचा समावेश होता. मात्र, पुढील वर्षी संघांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ‘बीसीसीआय’ने २०२३ मध्ये महिला ‘आयपीएल’ला सुरुवात करणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी म्हटले होते.

शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात सुपरनोव्हाज संघाने व्हेलोसिटीवर चार धावांनी मात करत तिसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले. या स्पर्धेच्या चौथ्या हंगामात अनेक उद्योन्मुख खेळाडू दर्जेदार कामगिरी करत प्रकाशझोतात आल्या. सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनप्रीतने तीन डावात ५०.३३ च्या सरासरीने १५१ धावा केल्या. सुपरनोव्हाजच्या पूजा वस्त्रकारने सहा बळी मिळवले, तर युवा खेळाडू किरण नवगिरेने पदार्पणात २५ चेंडूंत स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतकाची नोंद केली.