World Cup 2025 Jemimah Rodrigues Emotional Disclosure: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रीग्जने १२५ धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयात सर्वात मोठी भूमिका बजावली. जेमिमा संघाला विजय मिळवून देत माघारी परतली. पण या विजयी खेळीनंतर जेमिमाने मोठं वक्तव्य करत या वर्ल्डकपदरम्यान तिची कोणत्या स्थितीतून जात आहे, हे सांगितलं.
जेमिमा रॉड्रीग्ज सामनावीर ठरल्यानंतर म्हणाली, “मला सर्वप्रथम देवाचे आभार मानायचे आहेत. हे मी स्वतःच्या बळावर करू शकले नसते. माझ्या आई-वडिलांचे, कोचचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते. गेल्या महिन्यात सगळं खूप कठीण गेलं, आज जे काही घडलंय ते स्वप्नासारखं वाटतंय, अजूनही विश्वास बसत नाही.”
संपूर्ण स्पर्धेत भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर हरलीन देओल खेलताना दिसली आहे. पण या सामन्यात अचानक जेमिमाला तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्यात आलं. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याबाबत जेमिमा म्हणाली, “मला खरंच माहित नव्हतं की मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. मला फक्त एवढं सांगितलं होतं की तू फ्री झाल्यावर कळवं आणि मैदानात उतरण्याच्या पाच मिनिटं आधी मला सांगितलं की मी तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे.”
जेमिमाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार असल्याचा निर्णय कधी कळला?
जेमिमाने शतकी खेळीनंतर सेलिब्रेशन न करण्याबद्दल बोलताना म्हणाली, “आज मला माझ्या विक्रमाबद्दल काही महत्त्वाचं नाही. मला भारतासाठी हा सामना जिंकायचा होता. आधीच्या कठीण सामन्यांमध्ये आम्ही हरलो होतो, म्हणून या वेळेस शेवटपर्यंत लढायचं ठरवलं होतं. आज माझं अर्धशतक किंवा शतकाबद्दल नव्हतं, आज भारताला जिंकवायचं होतं.”जे
“आत्तापर्यंत जे काही घडलं, ते सगळं या क्षणासाठीचं नियोजन होतं असं वाटतंय. गेल्या वर्षी मला विश्वचषकातून वगळण्यात आलं होतं, तेव्हाही मी चांगल्या फॉर्ममध्ये होते. पण एकामागून एक अडचणी येत राहिल्या. माझ्या नियंत्रणात काहीच नव्हतं. या स्पर्धेदरम्यान मी जवळपास रोज रडले आहे. मी प्रचंड मानसिक तणावात होते. मला खूप चिंता वाटत होती. पण संघातील सर्व खेळाडूंनी मला सांभाळून घेतलं. सातत्याने सर्व जण माझ्याशी चर्चा करत होते. पण मला माहित होतं की मला मैदानात उतरून लढावंच लागेल. मी तेच केलं आणि देवाने सगळं सांभाळून घेतलं.”
“सुरुवातीला मी फक्त खेळत होते आणि स्वतःशी बोलत होते. शेवटी मी बायबलमधील एक श्लोक मनात म्हणत होते, शांत, तू फक्त मैदानावर उभी राहा, देव तुझ्यासाठी लढेल आणि खरंच, मी फक्त उभी राहिले… देवाने माझ्यासाठी लढा दिला. आत खूप भावना होत्या, पण शांत राहण्याचा प्रयत्न करत होते. भारताने पाच गडी राखून विजय मिळवला तेव्हा मी स्वतःला थांबवू शकले नाही.”
“जेव्हा हरमनप्रीत कौर मैदानावर आली, तेव्हा फक्त एक चांगली भागीदारी जमवायची एवढंच ठरवलं होतं. शेवटी मी स्वतःला खेळण्यासाठी प्रोत्साहित करत होते, कारण माझ्यात फार ताकद उरली नव्हती. तेव्हा दीप्ती माझ्याशी प्रत्येक चेंडूनंतर बोलत होती, प्रोत्साहन देत होती. जेव्हा मी स्पर्धेदरम्यान मागे पडत होती, तेव्हा माझ्या सहकाऱ्यांचं प्रोत्साहन मला पुढे नेतं होतं. मी कोणत्याही गोष्टीचं श्रेय स्वतःला देऊ शकत नाही, हे मी एकटीने केलं नाही,” असं जेमिमा म्हणाली. जेमिमा प्रतिक्रिया देताना संपूर्ण वेळ रडत होती.
