सुल्तार जोहर चषक हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविणाऱ्या २१-वर्षांखालील भारतीय हॉकी संघाचे मंगळवारी नवी दिल्लीमध्ये अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. मलेशियात झालेल्या या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनवर २-१ अशी मात केली. विजेतेपद राखणाऱ्या या संघाचे स्वागत करण्यासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्रीडारसिक, खेळाडूंचे नातेवाईक तसेच हॉकीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.  
स्पर्धेत दोन वेळा हॅट्ट्रिक नोंदविणारा व स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा हरमनप्रित सिंग म्हणाला, ‘‘विजेतेपद मिळविण्यापेक्षाही ते टिकविणे अधिक कठीण असते. आम्ही यंदाही विजेतेपद मिळविण्यासाठी खेळलो. संघात अत्यंत चांगला समन्वय होता. प्रत्येक खेळाडूने एकमेकांना प्रोत्साहन दिले. या स्पर्धेतील सर्वोच्च कामगिरीमुळे आमचा आत्मविश्वास उंचावला असून यापेक्षाही मोठे आव्हान समर्थपणे पेलण्याची आमची तयारी झाली आहे. वैयक्तिक कामगिरीबरोबरच सांघिक कामगिरीही अतिशय समाधानकारक झाली.’’