समुद्रसपाटीपासून उंचावर असलेले पांचगणीमधील टेबल टॉप हे मोठे पठार पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. या टेबल टॉपच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक पांचगणी व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर भव्य कबड्डीची दंगल पांचगणीमधील आणि आसपासच्या गावांसाठी जणू पर्वणीच ठरली. बोचणाऱ्या थंडीची तमा न बाळगता सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत हे सामने रंगले. मुंबईची कबड्डी आता शास्त्रोक्त झाली आहे. पण अस्सल धसमुसळ्या कबड्डीची नजाकत या मातीतील कबड्डीमध्ये अधिकच लक्ष वेधत होती. मग छोटय़ा मुलांसाठीची कबड्डी असो की खुल्या गटाची, प्रेक्षक दिवसभर उत्साहाने हे सामने पाहायला आले. खुल्या गटात चाळिशी पार केलेलेही अनेक कबड्डीपटू आपल्या गावची शान राखण्यासाठी आणि आपल्या संघाकडून कबड्डीचे धडे गिरवून घेण्यासाठी खेळत होते. चढाया, पकडी, बैठी, चवडा काढणे, आदी कबड्डीची तंत्रे या खेळाडूंना शास्त्रीय पद्धतीने ज्ञात नव्हती. पण कबड्डीशी नाळ जुळलेल्या या कबड्डीपटूंचे हौशी तंत्र लक्षवेधक असेच होते. सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अधिपत्याखाली येणाऱ्या पांचगणीतील गावांमध्ये २०हून अधिक संघ कार्यरत आहेत. पांचगणी व्यायाम मंडळाच्या जिल्हास्तरीय स्पध्रेत तर आसपासच्या गावांसहित ३५हून अधिक संघ प्रत्येक गटात हिरिरीने सहभागी झाले होते. परंतु गेल्याच महिन्यात सातारा जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा झाली. या स्पध्रेत पांचगणीतील एकही संघ सहभागी झाला नव्हता. या औदासीन्यामागे दडले आहे ते पांचगणीमधील कबड्डीचे दु:ख. ज्यामुळे ग्रामीण गुणवत्तेची खाण असणाऱ्या पांचगणीतील कबड्डीला मर्यादा आल्या आहेत.
‘‘सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनवर मोजक्या मातब्बर संघांची मक्तेदारी आहे. त्यामुळे उर्वरित साताऱ्यामधील कबड्डीच्या गुणवत्तेला योग्य न्याय मिळत नाही. हे चित्र बदलल्यास पांचगणीमधील कबड्डीला सुगीचे दिवस येतील,’’ असे मत पांचगणी व्यायाम मंडळाचे कार्यकारिणी सदस्य शेखर भिलारे यांनी व्यक्त केले. भारतमाता क्रीडा मंडळाच्या जुन्या-जाणत्या हरिदास साबळे यांनीही पांचणगीच्या कबड्डीपटूंना संधी मिळत नसल्याची कैफियत मांडली. ‘‘या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेनिमित्त अनेक राष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पांचगणीवासीयांना पाहायला मिळाला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने पुढाकार घेऊन येथील कबड्डीच्या विकासासाठी आवश्यक पावले उचलावीत,’’ असे मत राजेश राजपुरे यांनी व्यक्त केले. ‘‘राज्य कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली पांचगणीत कबड्डीसाठी काही उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळेच येथील कबड्डीला संजीवनी मिळेल,’’ अशी आशा महाराष्ट्राचे माजी कर्णधार फिरोझ पठाण यांनी व्यक्त केली.
पांचगणीमधील कबड्डी संघटक तानाजी भिलारे म्हणाले की, ‘‘पर्यटकांसाठी आमचा भाग लोकप्रिय असल्यामुळे येथील बरीच मंडळी त्याच्याशी निगडित व्यावसायांवरच उदरनिर्वाह करतात. डोंगराची पाश्र्वभूमी लाभल्यामुळे काटकपणा त्यांच्या नसानसांत भिनला आहे. कबड्डीवर येथील माणसे खूप प्रेम करतात. आपल्या गावचा संघ हे त्यांचे वैभव असते. भाकरीचे गाठोडे बांधून मग गावातली माणसे आपल्या संघाला प्रोत्साहन द्यायला येतात.’’
ग्रामीण महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्राची बऱ्याच अंशी हीच व्यथा आहे. पांचगणीसारख्या छोटय़ा ठिकाणांना कबड्डीमध्ये योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गरज आहे ती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघाने पुढाकार घेऊन काही विशेष महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याची.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
पांचगणीतील कबड्डीचा दम कोंडला!
समुद्रसपाटीपासून उंचावर असलेले पांचगणीमधील टेबल टॉप हे मोठे पठार पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. या टेबल टॉपच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक पांचगणी व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर भव्य कबड्डीची दंगल पांचगणीमधील आणि आसपासच्या गावांसाठी जणू पर्वणीच ठरली.
First published on: 22-01-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi is in danger in pachgani