कोरियाचे प्रशिक्षक-व्यवस्थापकांकडून कबड्डीबाबतची कैफियत

विश्वचषक कबड्डीसाठी आम्ही भारतात आलो असलो, तरी आमच्या देशात कुणालाही त्याचे फारसे देणेघेणे नाही. अगदी आम्ही जगज्जेतेपद जिंकले तरी त्याचे अप्रूप वाटणार नाही, अशी कैफियत कोरियाचे प्रशिक्षक ईऑम तई डूक आणि व्यवस्थापक जो ह्य़ुना यांनी व्यक्त केली.

२०१४च्या इन्चॉन आशियाई क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक मिळाल्यावर देशात कशा प्रकारे कौतुक झाले, या प्रश्नाला उत्तर देताना डूक म्हणाला, ‘‘आशियाई क्रीडा स्पध्रेतील पदक आम्हाला विश्वचषकापेक्षा निश्चितच अधिक महत्त्वाचे होते. मात्र या यशाची फारशी कुणी दखल घेतली नव्हती, पण पदक मिळाल्याबद्दल चारशे डॉलर इनाम प्रत्येकाला देण्यात आले होते.’’

विश्वचषकात कोणते लक्ष्य समोर आहे, याविषयी डूक म्हणाले, ‘‘सलामीच्या लढतीत यजमान भारतावर आश्चर्यकारक विजय मिळवल्यानंतर आता बांगलादेशला हरवण्याचे आव्हान समोर असेल. मग उपांत्य फेरीत इराणला आणि अंतिम फेरीत भारताला हरवणे आवश्यक आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘या कामगिरीच्या बळावर प्रो कबड्डी लीगमध्ये आणखी काही खेळाडूंना संधी मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे खेळाडूंच्या विकासाला तो अनुभव उपयुक्त  ठरेल.’’

विश्वचषकाच्या तयारीविषयी ह्य़ुना म्हणाली, ‘‘सहा महिन्यांपूर्वी आम्ही विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी संघाचा सराव सुरू केला आहे. कोरियाकडे भारतासारखे कबड्डीचे मुबलक खेळाडू नाहीत. जकार्ता आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी आम्ही २० खेळाडू निवडले आहेत. या स्पध्रेच्या निमित्ताने त्यांना चांगला अनुभव मिळणार आहे.’’

देशातील कबड्डीच्या वातावरणाविषयी ह्य़ुना म्हणाली, ‘‘कोरियात १५० खेळाडूंची राष्ट्रीय संघटनेकडे नोंदणी आहे. पदवी शिक्षण घेणारे आणि शिक्षकीय पेशातील खेळाडूंचा यात विशेष भरणा आहे. तायक्वांदोच्या मॅट्सवर आम्ही तो खेळतो. बुसानमध्ये कबड्डी अधिक लोकप्रिय आहे. या शहराला समुद्रकिनाऱ्याची देणगी लाभली आहे. त्यामुळे किनाऱ्यांवरच आम्ही प्रामुख्याने सराव करतो. त्यामुळे खेळाडूंची तंदुरुस्ती वाढते.’’

नुकत्याच झालेल्या आशियाई समुद्रकिनारी स्पध्रेत कोरियाचा संघ सहभागी झाला होता. पाकिस्तानकडून उपांत्य फेरीत एका गुणाने कोरिया पराभूत झाला होता. याशिवाय मागील दोन्ही आशियाई क्रीडा स्पध्रेत कोरियाच्या दोन्ही संघांनी भाग घेतला होता.

कोरियात खो-खोचेही आकर्षण

कोरियात खो-खो या खेळाचे विशेष आकर्षण आहे. याशिवाय आटय़ापाटय़ासदृश एक खेळ नागरिक आवडीने खेळतात, असे डीऑक यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कबड्डी हा खरा भारताचा खेळ आहे. आमच्या देशात खेळला जाणारा ओजिंगू डालगुगी किंवा डॅमँगू नावाचा एक खेळ आणि खो-खोसुद्धा खेळला जातो. तसेच प्रो कबड्डी लीगसुद्धा टीव्हीवर पाहिली जाते.’’