Karun Nair Reaction After Being Dropped IND vs WI: आशिया चषकानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी आज गुरूवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यावर संघात संधी दिलेल्या करूण नायरला मात्र या मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलं आहे. याबाबत त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रिय क्रिकेट मला एक संधी दे अशी पोस्ट करणाऱ्या करूण नायरला क्रिकेटने अजून एक संधी दिली. इंग्लंडविरूद्ध कसोटीसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली, पण तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. दरम्यान आता घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड होईल अशी अपेक्षा असताना त्याला वगळण्यात आलं आहे.
करूण नायरने ३००० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेल्या संधीतील इंग्लंड दौऱ्यामधील चार कसोटी सामन्यांमध्ये २०५ धावा केल्या. दरम्यान वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिकेसाठी जाहीर होण्याची करूण वाट पाहत असताना त्याच्यासाठी ही बातमी धक्का देणारी होती, कारण त्याची संघात निवड झालीच नाही.
करूण नायरने संघातून वगळल्यानंतर टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “हो माझी संघात निवड होईल अशी मला अपेक्षा होती. पण मला आता काय बोलावं ते कळत नाहीये. माझ्याकडे शब्द नाहीयेत. माझ्याकडे यावर बोलण्यासारखं काही उरलंच नाही. यावर उत्तर देणं माझ्यासाठी अवघड आहे.”
करूण नायर पुढे म्हणाला, “उलट निवडकर्त्यांना विचारलं पाहिजे ते नेमका काय विचार करतायत. अखेरच्या कसोटी सामन्यातही मी अर्धशतक केलं होतं, जेव्हा कोणताच फलंदाज पहिल्या डावात चांगली खेळी करू शकला नव्हता. त्यामुळे संघ जिंकला त्या अखेरच्या सामन्यात मी महत्त्वाचं योगदान दिलं होतं असं मला वाटलं. पण ठिके आता जे आहे ते आहेच. या गोष्टींना इतकं महत्त्व दिलं जात नाही.”
करूण नायरला इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी त्याला संघातून वगळण्यात आलं. पण पाचव्या महत्त्वपूर्ण कसोटीसाठी त्याला पुन्हा प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केलं. त्याने पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात १०९ चेंडूत ५७ धावा केल्या. त्याच्याशिवाय पहिल्या डावात कोणताच फलंदाज चांगली खेळी करू शकला नव्हता. यासह भारताने अखेरची कसोटी ६ विकेट्सने जिंकत मालिका बरोबरीत आणली.
भारतीय संघातून तुला वगळण्यामागे मुख्य कारण काय असू शकतं? करूण नायर म्हणाला…
करूण नायरला पुढे प्रश्न विचारण्यात आला की, संघातून तुला वगळण्यामागे मुख्य कारण काय असू शकतं? यावर करूण म्हणाला, “मी याबाबत काही सांगू शकत नाही. याचबरोबर गोष्टी बदलण्यासाठी मी फार काही करू शकत नाही. त्यामुळे इतरांच्या नाही तर किमान माझ्या दृष्टिकोनातून मला फक्त पुढे चालत राहावं लागेल. मला एक गोष्ट माहितीये, मी माझं सर्वाेत्तम देण्याचा प्रयत्न केला, निवडकर्त्यांनी निर्णय घेतला आणि त्याचा आदर करावा लागेल. आता मी फक्त रणजी ट्रॉफी खेळणार आहे.”