Karun Nair On Rohit Sharma: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ही मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त झाली. विराट कोहली आणि रोहित शर्माने या मालिकेआधीच निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे या दौऱ्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले होते. दरम्यान २०१७ नंतर पहिल्यांदाच करुण नायरला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली. मात्र तो आपली छाप सोडू शकला नाही. तो फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. पण तो एका गोष्टीमुळे तुफान चर्चेत राहिला. ते म्हणजे, हेल्मेट घातल्यानंतर ते रोहित शर्मासारखा दिसतो असं म्हटलं जात होतं. यावर करुण नायरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू असताना करुण नायर ज्यावेळी फलंदाजीला आला होता, त्यावेळी त्याचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. ज्यात तो रोहित शर्मासारखा दिसून येत होता. यासह स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतानाही तो रोहित शर्मासारखा दिसून येत असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. त्याची तुलना रोहित शर्मासोबत केली जात होती. पण अशी तुलना करणं योग्य नसल्याचं करुण नायरने सांगितलं.

एका मुलाखतीत करुण नायरला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता की, “ तुझा आणि रोहित शर्माचा एक फोटो तुफान व्हायरल होत होता ज्यात तुझा स्टान्स आणि चेहरा हुबेहुब रोहित शर्मासारखा दिसून येत होता. तू तो फोटो नक्कीच पाहिला असशील?”

या प्रश्नाचं उत्तर देताना करुण नायर म्हणाला, “ आजकाल लोकं सर्वकाही पाहतात. तो या खेळातील एक दिग्गज खेळाडू आहे. मला काय बोलावं हेच कळत नाही. पण हे पाहून मला आनंद झाला. मी माझी तुलना रोहितसोबत नाही करू शकत. हे मुळीच योग्य ठरणार नाही. तो या खेळातील दिग्गज आहे आणि मी तर माझ्या कारकिर्दीची सुरूवात केली आहे.”

करुण नायरला इंग्लंड दौऱ्यावर पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली होती. पण त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मालिकेतील ४ सामन्यातील ८ डावात त्याने २५.६२ च्या सरासरीने २०५ धावा केल्या. यादरम्यान त्याला केवळ २ अर्धशतकं झळकावता आली.