आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी, सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची नावे बीसीसीआयला द्यावी लागणार आहेत. त्याची अंतिम तारीख आज ३० नोव्हेंबर आहे. राखीव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मेगा लिलावाची तारीख निश्चित केली जाईल. मात्र, याआधी केएल राहुल आणि राशिद खान यांच्यासह लखनऊ आणि अहमदाबादच्या दोन नवीन फ्रेंचायझीही अडचणीत आल्याचे दिसत आहे. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादने राहुल आणि राशिदबाबत दोन्ही फ्रेंचायझींनी बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
”नवीन फ्रेंचायझी राहुल आणि राशिद यांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांच्या योजनांवर परिणाम होत आहे”, अशी पंजाब आणि हैदराबाद संघाने तक्रार केली आहे, इनसाइड स्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली.
हेही वाचा – IND vs NZ : अजिंक्य रहाणेची टीम इंडियातून हकालपट्टी?; राहुल द्रविड म्हणतो, ‘‘तो लवकरच…”
”आम्हाला कोणतेही पत्र मिळालेले नाही, परंतु लखनऊ संघ खेळाडूंशी संपर्क करत असल्याची तोंडी तक्रार मिळाली आहे. आम्ही त्याची चौकशी करत असून त्यात तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई करू. संघांचा सध्याचा समतोल बिघडू नये. तीव्र स्पर्धेमध्ये हा प्रकार टाळला पाहिजे. सध्याच्या संघांनी खेळाडूंशी संपर्क साधणे योग्य नाही”, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीसीआयने तयार केलेल्या लिलावाच्या नियमांनुसार, दोन्ही नवीन फ्रेंचायझींना लिलावापूर्वी त्यांच्या आवडीचे दोन खेळाडू खरेदी करण्याचा पर्याय आहे, परंतु हा पर्याय ट्रेडिंग विंडो सुरू झाल्यानंतरच खुला होईल.