KL Rahul Clean Bowled Video Viral IND A vs AUS A: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल चर्चेचा विषय आहे. केएल राहुल धावा करत नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता पण आता तो ज्या पद्धतीने क्लीन बोल्ड झाला आहे ते पाहून सगळेच अवाक झाले आहेत. बॉर्डर गावस्कर मालिकेपूर्वी राहुल ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळत आहे. धावा करून फॉर्ममध्ये परतण्याची ही त्याची शेवटची संधी होती, पण इथेही तो फेल ठरला. दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या डावात तो फारच विचित्र पद्धतीने बाद झाला आहे.
केएल राहुल ज्या पद्धतीने क्लीन बोल्ड झाला त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की असं कोण बाद होतं. आज ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुल पुन्हा अभिमन्यू ईश्वरनसोबत डावाची सलामी देण्यासाठी आला. त्याने केवळ १० धावा केल्या आणि त्यासाठी त्याला ४४ चेंडूंचा सामना करावा लागला. राहुल ज्याप्रकारे क्लीन बोल्ड झाला आहे ते फार क्वचितच कधीतरी पाहायला मिळेल.
स्ट्राईकवर असलेल्या केएल राहुलच्या दोन पायांच्या मधून चेंडू गेला आणि स्टंपवर जाऊन आदळला. राहुल मात्र पिचवर चेंडू बघून मागेपुढे होताना दिसला. कोरी रोसीओलीचा चेंडू वाईड जात होता. राहुलनेही बाजूला सरकून चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचे नशीब वाईट होते. राहुल बाजूला सरकताच चेंडू त्याच्या पॅडच्या वरच्या भागावर आदळला आणि त्याच्या पायांमधून जाऊन स्टंपला लागला. केएल राहुलचाही त्याच्या आऊट होण्यावर विश्वास बसत नव्हता. तो निराश होऊन निघून गेला.
राहुल याच सामन्यातील पहिल्या डावात तो केवळ ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या चार धावा एका चौकाराच्या जोरावर आल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी केएल राहुलचीही संघात निवड करण्यात आली आहे. केएल राहुलला सरावासाठी भारत अ संघातून सरावासाठी पाठवले आहे पण राहुलच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.
केएल राहुलने ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामने खेळले आहेत. राहुलने या पाच सामन्यांमध्ये २०.७७ च्या सरासरीने १८७ धावा केल्या आहेत. २०१५ मध्ये त्याने सिडनीमध्ये शतक झळकावले होते. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात त्याला बॅट साथ देत नाहीये.
© IE Online Media Services (P) Ltd