चेन्नईमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील अटीतटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर एका विकेटने निसटता विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या विजयात फिरकीपटू तबरेझ शम्सीने सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळेच त्याला ‘प्लेअर ऑफ मॅच’ पुरस्कार मिळाला. या पार्श्वभूमीवर तबरेझ शम्सी कोण आहे याचा हा आढावा…
तबरेझ शम्सीचा जन्म १८ फेब्रुवारी १९९० रोजी झाला. ३३ वर्षीय तबरेझने २००९ मध्ये स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. फ्रँचायज क्रिकेटनंतर त्याला पहिली संधी २०१६ मध्ये आयपीएल चषकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिली. सॅम्युअल बद्री जखमी झाल्याने त्याला ही संधी मिळाली.
२०१७ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारात पदार्पण
त्या सिझनमध्ये शम्सीला केवळ ४ सामन्यांमध्ये खेळता आलं. मात्र, गोलंदाजांसाठी प्रतिकुल वातावरण असल्याने त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. २०१७ मध्ये तबरेझ शम्सीने दक्षिण अफ्रिका संघासाठी खेळताना टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
२०१३-१४ मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला
स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना सुरुवातीचे काही वर्ष तबरेझ शम्सीला आपल्या खेळाचं सर्वोत्तम प्रदर्शन करता आलं नाही. २०१३-१४ मध्ये त्याने आपल्या उत्तम गोलंदाजीची ताकद दाखवत ४७ विकेट घेत तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. या खेळीने अनेकांचं लक्ष त्याच्या खेळाकडे खेचलं. २०१५ मध्ये त्याला कॅरिबियन प्रीमियर लीगकडून करारबद्ध करण्यात आलं. तसेच २०१६ मध्ये त्याला थेट आयपीएलमध्ये संधी मिळाली.
हेही वाचा : Pak vs SA: दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानवर एका विकेटने थरारक विजय…
२०२१ मध्ये टी-२० गोलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक
२०१९ मध्ये पहिल्यांदा तबरेझ शम्सीला क्रिकेट विश्व चषकात खेळण्याची संधी मिळाली. २०२१ मध्ये शम्सीने आपल्या खेळाच्या जोरावर टी-२० गोलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला. २०२१ आणि २०२२ दोन्ही वर्षी त्याचा दक्षिण अफ्रिकेच्या टी-२० विश्वचषक संघात समावेश झाला. तसेच २०२३ च्या विश्वचषकातही १५ सदस्यीय दक्षिण अफ्रिका संघात त्याचा निर्विवादपणे समावेश झाला.