बतुमी : महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील भारताच्या कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातील दुसरा डावही रविवारी बरोबरीत सुटल्यामुळे आता विजेतेपदाचा निर्णय आज, सोमवारी होणाऱ्या टायब्रेकरमध्ये लागणार आहे.
पारंपरिक पद्धतीमधील दुसरा डाव अपेक्षेइतका रंगला नाही. दोघींच्या आक्रमक आणि बचावाच्या भक्कम खेळामुळे एका क्षणी रंगत निर्माण झाली होती. मात्र, एरवी आक्रमक असलेल्या दिव्याच्या भक्कम बचावामुळे डाव बरोबरीत राहणार हे निश्चित झाले.
कोनेरू हम्पीचा अनुभव आणि दिव्याने केलेला तिचा पूर्ण अभ्यास हेच दुसऱ्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. आक्रमक खेळण्याचा लौकिक असतानाही दिव्याचा दुसऱ्या डावातील संयम खूपच लक्षवेधक ठरला. इंग्लिश ओपन पद्धतीने सुरू झालेला डाव पुढे क्वीन्स गॅम्बीट डिक्लाइन डावात परावर्तीत झाला. हम्पीने दुसऱ्या डावात उंटाच्या मोहऱ्यांसह फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पटावरील प्याद्याची स्थिती तिला अडचणी निर्माण करत होती. अशा वेळी दिव्याने आपले घोड्यांचे मोहरे भक्कम स्थितीत ठेवून हम्पीची चांगल्या पद्धतीने कोंडी केली.
हम्पीने अखेरच्या डावात प्याद्याचा बळी देऊन डावात प्रगती करण्याचा प्रयत्न केला. पण, या प्रक्रियेत तिला उंटाचे मोहरे गमवावे लागले. अखेर दोघींकडून एकच चाल तीनवेळा झाल्याने नियमानुसार ३४व्या चालीला डाव बरोबरीत सुटला. आता टायब्रेकरमध्ये १५ मिनिटांचे दोन डाव खेळले जातील. त्यानंतरही बरोबरी राहिल्यास आणखी दहा मिनिटांचा डाव होईल. यानंतरही बरोबरीची कोंडी न फुटल्यास पाच मिनिटांचे आणखी दोन डाव होतील.