सातत्यपूर्ण यश मिळविणाऱ्या लेविस हॅमिल्टन याने सुरेख कौशल्य दाखवित ऑस्ट्रेलियन ग्रां.प्रि.मोटार शर्यतीत शनिवारी पोल पोझिशन मिळविली. विश्वविजेता सेबॅस्टीयन व्हेटेल याला मात्र पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले.
चुरशीने झालेल्या शर्यतीत हॅमिल्टन याने अंतिम क्षणी स्थानिक खेळाडू डॅनियल रिकाडरे याला मागे टाकले. रेड बुल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिकाडरे याला शेवटच्या वळणावर हॅमिल्टन याने पिछाडीवर टाकले. जर्मनीचा २००८ चा विश्वविजेता खेळाडू निको रोसबर्ग याने तिसरे स्थान घेतले.
मॅकलरेन संघाचा केविन मॅग्नसन व फेरारी संघाचा फर्नान्डो अलोन्सो यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळविले. लागोपाठ दहावा विजय मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या व्हेटेल याने निराशा केली. त्याला रविवारी १२ व्या क्रमांकाने ही शर्यत सुरू करावी लागणार आहे.
हल्केनबर्गच्या कामगिरीमुळे भारताचे आव्हान कायम
निको हल्केनबर्ग याने सहारा इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करताना सातवे स्थान मिळविले. त्यामुळे भारताच्या आशा कायम राहिल्या. टोरो रोस्सो संघाच्या जीन एरिक व्हर्जिन व डॅनिल कियात यांना अनुक्रमे सहावे व आठवे स्थान मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lewis hamilton claims pole position for australian grand prix