इराण आणि थायलंडमध्ये कबड्डीच्या प्रचार-प्रसारासाठी धडपडणाऱ्या दोन महान व्यक्तींच्या मुली आता या खेळासाठी धडपडत आहेत. थायलंडची सवारत फोंचू आणि इराणची लैला सैफी विश्वचषक कबड्डी स्पध्रेत पंचगिरीची भूमिका बजावत आहेत आणि आपल्या वडिलांचाच वसा जणू पुढे चालवत आहेत.

थायलंडच्या सवारत हिचे वडील सोमप्राच फोंचू यांनी कबड्डीसाठी आपले आयुष्य वेचले. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत व्यवसायाने शिक्षिका असलेल्या सवारतने तीनदा खेळाडू म्हणून भारत दौरा केला आहे. यावेळी चौथ्या दौऱ्यात मात्र ती पंच म्हणून कार्यरत आहे. फोंचू यांच्या कार्याविषयी आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे तांत्रिक संचालक ई. प्रसाद राव म्हणाले, ‘‘सोमप्राच फोंचू यांनी जे कबड्डीसाठी कार्य केले आहे, तसे भारतातसुद्धा कोणी केले नाही, असे मी खात्रीने सांगू शकतो. १५ वर्षांपूवी जेव्हा भारतातसुद्धा कुणाला कबड्डी अकादमी काढण्याचे सुचले नव्हते. त्यावेळी फोंचू यांनी थायलंडमध्ये अकादमी सुरू केली. स्वत:च्या घराच्या अंगणात त्यांनी क्रीडांगण तयार केले आणि आपल्या गाडीवर कबड्डी खेळा, असे आवाहन करीत खेळाडूंना घरापर्यंत घेऊन यायचे. मग त्यांची पत्नी या मुलांसाठी छान जेवणही करायची. थायलंडमध्ये आज ज्या प्रमाणात कबड्डी खेळली जात आहे, त्याचे श्रेय फोंचू यांना जाते. त्यामुळे तेथील कबड्डीविश्वात त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. ’’

आंतरराष्ट्रीय पंचगिरीच्या आव्हानाविषयी सवारत म्हणाली, ‘‘सुरुवातीला विश्वचषक कबड्डी स्पध्रेच्या पंचगिरीबाबत माझ्यावर दडपण होते. मात्र भारतातील पंचांनी आत्मविश्वास वाढवून आम्हाला नियमांबाबत अधिक समृद्ध केले.’’

फोंचू यांच्याप्रमाणेच इराणच्या कबड्डी संघाच्या आणि संघटनेच्या विकासात सैफी अब्दुल्ला यांनी अपार मेहनत घेतली. काही वर्षांपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आता त्यांची ३४ वर्षीय मुलगी लैला खेळाच्या विकासासाठी धडपडत आहे. लैला इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आहे. इतकेच नव्हे, तर माहिती-तंत्रज्ञान विषयात तिने पीएच.डी.सुद्धा मिळवली आहे. मात्र वडिलांकडून मिळालेली कबड्डीची दीक्षा तिला स्वस्थ बसू देईना. २००५मध्ये हैदराबादला झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत तिने देशाचे प्रतिनिधित्व केले होते. आता भारत-कोरिया यांच्यातील पहिल्या लढतीला लैलाने आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पदार्पण केले.

इराणमधील कबड्डीमधील वातावरणाविषयी लैला म्हणाली, ‘‘आमच्या देशात मुलींना हिजाब परिधान करूनच खेळावे किंवा पंचगिरी करावी लागते. याशिवाय पुरुष आणि स्त्रिया या त्यांच्याच विभागांमध्ये पंचगिरी करू शकतात. परंतु माझी विश्वचषकासाठी निवड झाल्यामुळे देशात कौतुकाची लाट पसरली आहे. प्रसारमाध्यमांनी माझ्या निवडीची योग्य दखल घेतली आहे.’’