इस्तंबूल : यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केल्यानंतर बलाढ्य लिव्हरपूल फुटबॉल क्लबला एकाच आठवड्यात दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. प्रीमियर लीगमध्ये क्रिस्टल पॅलेसकडून हार पत्करल्यानंतर लिव्हरपूलला चॅम्पियन्स लीगमध्ये गॅलतासरायकडून ०-१ असा पराभवाचा धक्का बसला. रेयाल माद्रिद, बायर्न म्युनिक आणि चेल्सी या संघांनी अपेक्षित विजय नोंदवले.

गॅलतासरायविरुद्ध लिव्हरपूलने चेंडूवर अधिक वेळ ताबा राखला. मात्र, त्यांना गोलच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. त्यातच बचावात त्यांच्याकडून काही चुका घडल्या. मध्यरक्षकांचा खेळही निराशाजनक ठरला. गॅलतासरायला १६व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. यावर तारांकित आघाडीपटू व्हिक्टर ओसिमेनने गोल नोंदवला. त्यानंतर उत्तरार्धाच्या सुरुवातीला गॅलतासरायने गोलच्या दोन संधी वाया घालवल्या. मात्र, त्यांनी बचाव भक्कम राखताना सामना १-० असा जिंकला.

दुसरीकडे, किलियन एम्बापेच्या हॅटट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने कझाकस्ताच्या एफसी कैरात संघाचा ५-० असा सहज पराभव केला. कैरात संघाचा चॅम्पियन्स लीगमधील हा पहिला सामना होता. जर्मनीतील बलाढ्य बायर्न म्युनिक संघाने सायप्रसच्या पाफोस संघावर ५-१ अशी मात केली. आघाडीपटू हॅरी केनने दोन, तर राफाएल गरेरो, निकोलस जॅक्सन आणि मायकल ओलिसे यांनी एकेक गोल नोंदवला. चेल्सीने बेन्फिकावर १-० असा निसटता विजय मिळवला. ॲटलेटिको माद्रिद, इंटर मिलान आणि आयेक्स संघांनीही आपापले सामने जिंकले.