आठवडय़ाची मुलाखत : मेराज शेख, इराणच्या कबड्डी संघाचा कर्णधार

जागतिक दर्जाच्या कुस्तीपटूंसाठी इराण विशेष ओळखला जातो. कसदार शारीरिक संपदेची ही वैशिष्टय़े इराणी लोकांमध्ये असल्यामुळे कबड्डीतसुद्धा इराणी शैली आता प्रभाव दाखवत आहे, असे मत इराणचा संघनायक मेराज शेखने व्यक्त केले. प्रो कबड्डी लीगमधील चार हंगामांमध्ये आपल्या दिमाखदार खेळाच्या बळावर छाप पाडणाऱ्या मेराजने आगामी विश्वचषक कबड्डी स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर भारताला सावधानतेचा इशाराच जणू दिला आहे. विश्वचषक स्पध्रेतील आव्हाने, संघाची तयारी आणि इराणमधील कबड्डीची सद्य:स्थिती याबाबत मेराजशी केलेली खास बातचीत –

  • मागील दोन विश्वचषकांमध्ये इराणला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आगामी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इराण भारताला नमवू शकेल का?

शंभर टक्के. इराणच्या संघाने नेहमीच ताकदीने आपला ठसा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उमटवला आहे. मात्र मागील विश्वचषकापासून इराणच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. या वेळी योग्य रणनीतीनुसार आम्ही खेळू. आमच्या संघात लढण्याची ऊर्जा असलेल्या युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे.

  • इराणच्या संघाच्या तयारीविषयी काय सांगशील?

जुन्या सामन्यांचे आणि सरावाचे चित्र पाहून बलस्थाने आणि कच्च्या दुव्यांचा आम्ही अभ्यास करतो. याचप्रमाणे अन्य देशांचे खेळाडू, त्यांची पद्धती याबाबत समजून घेत त्यानुसार योजना आखण्याचे धोरण प्रशिक्षकांनी अवलंबले आहे. याच योजनेनुसार मग प्रत्येक सामन्यात खेळाडू खेळवले जातील.

दोन वर्षांपूर्वी आशियाई क्रीडा स्पध्रेत इराणविरुद्ध भारताला विजेतेपद वाचवणे कठीण गेले होते. आगामी विश्वचषकाला सामोरे जाताना ते आत्मविश्वास उंचावणारे ठरेल का?

नक्कीच. मागील दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचा संघ आमच्याविरुद्ध सावधपणे खेळला आहे. या वेळीसुद्धा आम्ही योग्य रणनीती आखून खेळू.

  • प्रो कबड्डी लीगमुळे तुझ्यासह इराणच्या अनेक खेळाडूंच्या कौशल्यात सुधारणा झाली आहे, याविषयी तुझे मत काय आहे?

प्रो कबड्डीच्या चार हंगामांमुळे या खेळाची लोकप्रियता वाढली आहे आणि परिभाषासुद्धा बदलली आहे. २०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेप्रमाणेच आगामी विश्वचषक स्पध्रेतसुद्धा हे बदल पाहायला मिळतील. भारतानंतर इराणही उत्तम कबड्डीपटूंची खाण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अभेद्य बचाव हे इराणी खेळाडूंचे वैशिष्टय़ आहे. प्रो कबड्डीच्या चौथ्या हंगामात पाटणा पायरेट्सकडून खेळणाऱ्या फझल अत्राचालीला सर्वोत्तम बचावपटूचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय माझ्या अष्टपैलू कामगिरीचे कौतुक केले जाते. बचावाप्रमाणेच आमच्या खेळाडूंच्या चढायांचे चापल्य हे लक्षवेधी असते.

  • इराणमध्ये कबड्डीचे वातावरण कशा प्रकारे आहे?

कबड्डी हा आमच्या देशात अतिशय लोकप्रिय खेळ असून विविध स्तरांवर खेळला जातो. व्यावसायिक, प्रथम श्रेणी, समुद्रकिनारी, सर्कल, कनिष्ठ, वरिष्ठ, शाळा, महाविद्यालय आदी प्रकारांमध्ये हा खेळ खेळला जातो. नुकत्याच झालेल्या व्यावसायिक स्पध्रेत १६ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धामधून इराणच्या राष्ट्रीय संघाला उत्तम खेळाडू मिळतात. याशिवाय कनिष्ठ आणि वरिष्ठ गटांमध्ये ३१ प्रांतांचे संघ सहभागी होतात. निवड चाचणी स्पर्धातून इराण कबड्डी महासंघाने ३३ सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली. यातूनच विश्वचषकासाठी राष्ट्रीय संघ निवडण्यात आला.

  • इराणच्या कबड्डीतील या वाटचालीचे तू कशा प्रकारे विश्लेषण करशील?

भारताप्रमाणेच कबड्डी हा इराणमध्ये पारंपरिक क्रीडा प्रकार मानला जातो. तो आमच्या देशात ‘झोऊ’ या नावाने ओळखला जातो. भारतीय खेळाडू कबड्डी कुशलतेने खेळतात, तर इराणी खेळाडू प्रचंड ऊर्जेने खेळतात. त्यामुळेच इराणच्या संघाशी सामने करणे आव्हानात्मक असते.