|| ऋषिकेश बामणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आठवडय़ाची मुलाखत : यशस्वी जैस्वाल, भारताचा युवा क्रिकेटपटू

बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या युवा (१९ वर्षांखालील) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला असला तरी माझे लक्ष्य सर्वप्रथम मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवण्याचे असून त्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचेही स्वप्न जोपासले आहे, अशी इच्छा भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने व्यक्त केली.

ज्वाला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीने क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. तेव्हापासूनच त्याने घेतलेली उत्तुंग भरारी पाहण्याजोगी आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहताना आयुष्यात कधी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेटही खेळायला मिळेल की नाही, अशी शंका असताना या पठ्ठय़ाने केलेली कामगिरी स्वप्नवतच म्हणावी लागेल. अशा या ध्येयवेडय़ा यशस्वीशी केलेली खास बातचीत-

  • युवा आशिया चषकाचे विजेतेपद आणि त्यातही सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान, या यशाविषयी काय सांगशील?

युवा आशिया चषकाच्या विजेतेपदावर नाव कोरण्याचा आनंद आहेच, पण तरीही मी काहीसा असमाधानीच आहे. कारण बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीतील लढतीत संघाला गरज असताना मी ३७ धावांवर बाद झालो. अखेरीस हा सामना आम्ही २ धावांनी जिंकलो असलो तरी संघाला विजय मिळवून देईपर्यंत आपण बाद व्हायचे नाही, हा धडा मी त्यादिवशी शिकलो. अंतिम फेरीत साकारलेली ८५ धावांची खेळी आणि श्रीलंकेचा शेवटचा फलंदाज बाद होताच संपूर्ण संघाने केलेला जल्लोष मला आयुष्यभर स्मरणात राहील.

  • प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाबद्दल काय वाटते?

खरे तर मी राहुल सरांना इतका भेटलेलो नाही. तसेच या स्पर्धेसाठी आमच्या संघासोबत वुर्केरी रामन सर होते. मात्र मार्च महिन्यात राहुल सरांशी झालेल्या भेटीत मी खूप काही शिकलो. लखनऊमध्ये आमची तिरंगी स्पध्रेपूर्वी भेट झाली होती. त्या वेळी राहुल सरांनी आम्हा प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केले. शिवाय रामन सरांनीही संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघात सकारात्मकतेचे वातावरण टिकून राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

  • मुंबईतील एमआयजी क्रिकेट क्लबपासून सुरू झालेल्या प्रवासाबद्दल तुझे काय मत आहे?

एमआयजीमध्ये अंजुमन इस्लाम संघासाठी १४ वर्षांखालील एका स्पर्धेत खेळत असतानाच मला ज्वाला सरांचा फोन आला व त्यानंतर माझे आयुष्य पालटले. वांद्रे येथून वाकोल्याला त्यांना भेटण्यासाठी बसमधून जाताना माझ्या मनात एक प्रश्न सारखा येत होता, की आपण का जात आहोत या व्यक्तीला भेटण्यासाठी? असे काय विशेष करणार आहेत ते माझ्यासाठी? मात्र माझ्या क्रिकेट कारकीर्दीचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. आझाद मैदानावर खेळताना त्यांनी मला पाहिले व पुढे दिलीप वेंगसरकर यांच्या अकादमीत प्रवेश मिळवल्यावर माझ्या कारकीर्दीने खऱ्या अर्थाने वेग धरला. त्यामुळे आयुष्यात यापुढेही जे काही यश मिळवेन, ते या सर्वानाच समर्पित राहील.

  • आशिया चषक झाला, आता पुढील लक्ष्य काय?

सध्या मी सुरतमध्ये विनू मंकड स्पध्रेत माझ्या फलंदाजीतील त्रुटींवर मेहनत घेत आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेला भारतात फार महत्त्व आहे. त्यामुळे या स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी उत्सुक आहे. विशेष म्हणजे मुंबईतील खेळपट्टय़ांवर फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांनाही सारखी मदत मिळते, त्यामुळे तेथे केलेल्या धावांचे सुख वेगळेच असते. त्याशिवाय भविष्यात भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवण्याचे स्वप्न असून एकेदिवशी कर्णधारपद सांभाळण्याची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी मी माझ्या सध्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करणार नाही. मी सातत्यपूर्ण फलंदाजी केली, तरच त्याचे फळ मला नक्की मिळेल, याची खात्री आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sport interview with yashasvi jaiswal