महाराष्ट्राने उत्कृष्ट सांघिक खेळ करीत संभाव्य विजेत्या हरयाणाला ४-१ असे पराभूत केले आणि वरिष्ठ राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी हॉकी स्पर्धेत सनसनाटी कामगिरी केली. अन्य लढतींमध्ये मुंबईने कर्नाटकवर २-१ असा विजय मिळवला तर कन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग) संघाने भोपाळचा ४-२ असा पराभव केला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने हरयाणाविरुद्ध पूर्वार्धात १-० अशी आघाडी मिळविली होती. महाराष्ट्राकडून विशाल पिल्ले, विनीत कांबळे, नवनीत स्वर्णकार व आशिष शेट्टी यांनी प्रत्येकी एक गोल केला. हरयाणाचा एकमेव गोल अर्जुनकुमार याने नोंदविला. महाराष्ट्राचा हा पहिलाच विजय आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी सेनादलाला १-१ असे बरोबरीत रोखले होते.
मुंबईने कर्नाटकविरुद्ध मिळविलेल्या विजयात देविंदर वाल्मीकी व व्हिक्टोसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. कर्नाटककडून एकमेव गोल सोमण्णा प्रधानने केला. मुंबई संघाचा हा लागोपाठ दुसरा विजय आहे. उत्तर प्रदेशने तामिळनाडूचा ६-२ असा पराभव केला व त्याचे श्रेय सुनील यादवने केलेल्या चार गोलांना द्यावे लागेल.
ओडिशाच्या गंगापूर संघाने झारखंड संघाचा ४-२ असा पराभव केला. पूर्वार्धात दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत होते. ओडिशा संघाकडून रोशन मिंझ याने दोन गोल केले तर बिकाश टोप्पो व विल्सन मिंझ यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. झारखंड संघाचे दोन्ही गोल चंद्रशेखर झाल्क्सो याने केले. कॅग संघाने भोपाळविरुद्ध पूर्वार्धात ३-० अशी आघाडी मिळविली होती. कॅग संघाकडून इम्रान खान याने दोन गोल करीत सिंहाचा वाटा उचलला. महंमद नईमउद्दीन व चंदनसिंग यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. भोपाळकडून ओसाफ उर रहेमान याने दोन्ही गोल करीत चिवट झुंज दिली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2015 रोजी प्रकाशित
वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा : महाराष्ट्राची हरयाणावर मात; मुंबई, कॅग संघांची आगेकूच
महाराष्ट्राने उत्कृष्ट सांघिक खेळ करीत संभाव्य विजेत्या हरयाणाला ४-१ असे पराभूत केले आणि वरिष्ठ राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी हॉकी स्पर्धेत सनसनाटी कामगिरी केली.
First published on: 22-04-2015 at 12:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra beat haryana in senior national hockey competition