महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत हरयाणाचा दुसरा डाव १७६ धावांत गुंडाळला आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत निर्णायक विजयाची संधी निर्माण केली. विजयासाठी २०८ धावांचे लक्ष्याला सामोरे जाताना त्यांनी मंगळवारी दिवसअखेर दुसऱ्या डावात बिनबाद नऊ धावा केल्या.
पहिल्या डावात ३१ धावांची आघाडी घेणाऱ्या हरयाणाला दुसऱ्या डावातही मोठी धावसंख्या रचण्यात अपयश आले. महाराष्ट्राच्या श्रीकांत मुंढे (४/३६), अनुपम संकलेचा (३/६३) व समाद फल्लाह (२/४८) यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे हरयाणाच्या फलंदाजांची दाणादाण उडाली.
हरयाणाकडून कुलदीप हुडा (३९) व सचिन राणा (३२) यांनी फलंदाजीत चमक दाखविली. सनी सिंग (२८) व नितीन सैनी (२३) यांचेही प्रयत्न अपुरे ठरले.
महाराष्ट्रापुढे विजयासाठी आव्हान सोपे असले, तरी पहिल्या डावात त्यांच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली होती. त्यामुळे अवघ्या १०५ धावांत त्यांचा खुर्दा उडाला होता. हे लक्षात घेता त्यांना बुधवारी शेवटच्या दिवशी सावध खेळ करावा लागणार आहे.
महाराष्ट्राकडे अनुभवी फलंदाजांचा तोटा नाही मात्र खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी केल्यास ते निर्णायक विजय सहज मिळवतील.
संक्षिप्त धावफलक
हरयाणा : १३६ व १७६ (कुलदीप हुडा ३९, सचिन राणा ३२, सनी सिंग २८, नितीन सैनी २३, श्रीकांत मुंढे ४/३६, अनुपम संकलेचा ३/६३,
समाद फल्लाह २/४८)  वि. महाराष्ट्र : १०५ व बिनबाद ९.