मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आणि क्रिकेटचे माहेरघर. याच मुंबईतली क्रिकेट सत्ता हाती राहावी यासाठी विविध राजकीय नेते आणि माजी खेळाडूंमध्ये अहमहमिका आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद तसेच बीसीसीआयचे माजी प्रमुख आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अध्यक्षपदासाठी विद्यमान उपाध्यक्ष विजय पाटील यांनी आव्हान दिले आहे.
एमसीएच्या १७ जूनला होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ही समीकरणे स्पष्ट झाली आहेत. मागील निवडणुकीत पाटील यांनी पवारांना पाठिंबा दिला होता. परंतु यंदा मात्र त्यांनी शिवसेनेच्या पाठबळावर कौटुंबिक संबंध असलेल्या पवारांविरुद्धच थेट दंड थोपटले आहे. पवारांच्या म्हाडदळकर गटाकडून उपाध्यक्षपदासाठी भाजप नेते आशीष शेलार यांच्यासह माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि विनोद देशपांडे यांनी अर्ज भरले आहेत. तर ‘क्रिकेट फर्स्ट’कडून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह प्रशिक्षक लालचंद रजपूत, माजी क्रिकेटपटू अॅबी कुरुविल्ला, संजय पाटील आपले नशीब अजमावणार आहेत. याशिवाय रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हेसुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
कोषाध्यक्षपदासाठी म्हाडदळकर गटाकडून नितीन दलाल आणि विनोद देशपांडे तर ‘क्रिकेट फर्स्ट’कडून मयांक खांडवाला आणि लालचंद रजपूत यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. संयुक्त सचिव पदासाठीसुद्धा म्हाडदळकर गटाकडून रवी सावंत, पी. व्ही. शेट्टी, विनोद देशपांडे यांचे तर ‘क्रिकेट फर्स्ट’कडून उन्मेश खानविलकर आणि संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
कार्यकारिणी सदस्य पदासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे ‘क्रिकेट फर्स्ट’कडून तर मागील निवडणुकीत उपाध्यक्षपद मिळवण्यात अपयशी ठरलेले राष्ट्रवादीचे पंकज ठाकूर म्हाडदळकर गटाकडून लढणार आहेत. १३ जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेर दिवस आहे, त्याच दिवशी खरे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
मी कुणाच्या विरोधात उभा आहे, असे मला वाटत नाही. लहानपणापासून मला क्रिकेटची आवड आहे. मला या खेळासाठी स्वत:चे योगदान द्यायचे आहे. अनेक सदस्य माझ्याकडे त्यांचे प्रश्न घेऊन येतात. त्यांनीच मला लढायला प्रेरणा दिली आहे. पवारांच्या पुढे राजकारणाच्या पटावर मी अतिशय लहान आहे. त्यांनी आमच्यासाठी नव्या प्रशासकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी मला आशा आहे.
– विजय पाटील
म्हाडदळकर गटाकडून मी तीन कार्यकाळ निवडणूक लढलो होतो. या गटाकडे अनुभवी प्रशासकांची फौज आहे. एमसीएची निवडणूक ज्यांना कार्य करण्यासाठी वेळ आहे, त्यांनीच लढवावी, असे मला वाटते. निवडणुकीचे खरे चित्र काय आहे, ते १३ जूनला स्पष्ट होईल. त्यानंतर त्यावर भाष्य करता येईल.
– दिलीप वेंगसरकर
शिवसेना नेते मुख्यमंत्र्यांकडे आले व त्यांनी सेना-भाजपने एकत्र लढावे अशी गळ घातली. त्यांना आम्ही संमती दिली. मात्र आमच्या संमतीनंतरही शिवसेना नेत्यांनी पाठ फिरवली. अशा स्थितीत माझ्याकडे म्हाडदळकर गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्याशिवाय पर्याय नव्हता.
-आशिष शेलार