लोढा समितीच्या शिफारशींच्या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची हकालपट्टी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आता मुंबई क्रिकेटमध्ये उमटत आहेत. ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आपला अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारिणीकडे सादर केल्यानंतर आता उर्वरित पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण लोढा समितीच्या शिफारशींनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यकारिणीवरील फक्त सहा जणांना पदे टिकवता येऊ शकतील. मात्र न्यायालयाच्या निर्णयातील स्पष्टता नीट होत नसल्यामुळे मुंबईचे क्रिकेट प्रशासक सावधपणे परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोढा समितीच्या शिफारशींनुसार नऊ वर्षांहून अधिक काळ कोणत्याही व्यक्तीला संघटनेवरील पद सांभाळता येणार नाही. या नियमानुसार एमसीएच्या निवडणुकीद्वारे सध्या कार्यरत असलेल्या १५ सदस्यांपैकी प्रवीण अमरे, गणेश अय्यर, शाह आलम, नवीन शेट्टी, आशीष शेलार आणि उन्मेश खानविलकर या सहा जणांनाच आपली पदे टिकवता येऊ शकतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

[jwplayer p9DkL1SW]

‘‘काही गोष्टींबाबत स्पष्टता झालेली नाही. कोणत्याही व्यक्तीला नऊ वर्षांपेक्षा अधिक काळ संघटनेचे पद भूषवता येणार नाही, असे म्हटले आहे. मात्र त्यांनी त्वरित पद सोडावे की कार्यकाळ पूर्ण झाल्यावर पद सोडावे, याबाबत अजून आम्हाला स्पष्टता झालेली नाही. त्यांना त्वरित पदावरून काढून टाका असे म्हटलेले नाही. या मंडळींना निवडणूक लढता येणार नाही, असे नक्की म्हटले आहे. याचाच अर्थ एमसीएची निवडणूक येत्या काही महिन्यांनी आहे. म्हणजे सध्याचे पदाधिकारी अजून तो कार्यकाळ संपेपर्यंत पदांवर राहू शकतील,’’ अशी आशा एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून व्यक्त केली.

‘‘येत्या काही दिवसांत कार्यकारिणी समितीची बैठक घेऊन सध्याच्या पेचप्रसंगाशी कसा सामना करायचा, हे ठरवू,’’ अशी प्रतिक्रिया एमसीए संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी व्यक्त केली. मात्र सध्याच्या स्थितीत एमसीएने विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी, यातच निवडणूक घेण्यात यावी किंवा स्वतंपणे ती घेण्यात यावी, असे मत एमसीएच्या एका माजी पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.

[jwplayer UUZQ3PNu]

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca post issue