Harshit Rana Viral Video: भारतीय संघात स्थान मिळवणं मुळीच सोपं नाही. स्थान मिळाल्यानंतर प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं हे त्याहून कठीण काम आहे. पण हर्षित राणा असा एकमेव गोलंदाज आहे, ज्याने कमी वेळात तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघात स्थान निश्चित केलं आहे. पण त्याला सोशल मीडियावार प्रचंड ट्रोल केलं जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. दरम्यान त्याच्या एअरपोर्टवरील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
आंतरराष्ट्रीय खेळाडूला पाहून प्रत्येक क्रिकेट चाहत्याला असं वाटतं की, खेळाडूसोबत एकतरी फोटो क्लिक करावा. त्यामुळे क्रिकेट चाहते खेळाडूच्या जवळ पोहोचण्यासाठी धडपड करतात. दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेला हर्षित राणा एअरपोर्टच्या आत एन्ट्री मारत होता, त्यावेळी एका चाहत्याने त्याच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी हर्षित राणाने जे काही म्हटलं, ते पाहून सर्वांनाच हसू अनावर झालं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हर्षित राणा आपली बॅग घेऊन एअरपोर्टच्या आत जाताना दिसून येत आहे. त्यावेळी एक चाहता येतो आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी उभा राहतो. पण त्याआधी तो चाहता हर्षितच्या हातात हात घालण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान हे हर्षितला मुळीच आवडत नाही. त्यावेळी तो म्हणतो, “मी गर्लफ्रेंड आहे का तुझी?” हे ऐकताच एअरपोर्टवर असलेले सर्व लोकं हर्षितकडे पाहू लागतात आणि हसू लागतात. हर्षितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड
फोटो काढण्याची विनंती करणाऱ्या चाहत्याने आधी हातात हात घातला, पण हर्षितने लगेचच हात झटकला. त्यानंतर हर्षितने चाहत्यासोबत फोटो क्लिक केला. हर्षित राणाचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. याआधी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील विजेत्या संघातही हर्षित राणाच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.