अनिल कुंबळे यांची खंत

भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी फिरकी गोलंदाज म्हणून उत्तम नाव कमावले. परंतु शिस्तबद्ध कार्यप्रणालीमुळे ‘हेडमास्टर’ हा शिक्का प्रशिक्षकपदाच्या उत्तरार्धातील कारकीर्दीत आपल्यावर बसल्याची खंत कुंबळे यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी चर्चा करताना प्रकट केली.

पालकांकडून कसे मार्गदर्शन मिळाले, असे विचारले असता कुंबळे म्हणाले, ‘‘स्वत:वर विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचे बाळकडू मला लहानपणी लाभले. माझे आजी-आजोबा व आई-वडिलांनी मला आत्मविश्वास व आत्मसन्मानाने वागण्याचा गुरुमंत्र दिला. माझे आजोबा हे कडक शिस्तीचे मुख्याध्यापक म्हणून ख्यातनाम होते. आता मला त्यांच्यासारखीच लोकप्रियता मिळाली आहे.’’

कुंबळे यांच्याकडे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद असताना खेळाडूंमध्ये शिस्तप्रिय प्रशिक्षक म्हणूनच त्यांची ओळख होती. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीशी मतभेद झाल्यानंतर कुंबळे यांना प्रशिक्षकपदावरून दूर व्हावे लागले. त्यांच्यातील मतभेदाबाबत कुंबळे किंवा कोहली यांनी आजपर्यंत कधीही जाहीरपणे मत व्यक्त केलेले नाही.

ऑस्ट्रेलियात २००३-०४मध्ये भारताने दौरा केला होता. त्याविषयी कुंबळे म्हणाले, ‘‘चार कसोटी सामन्यांची ही मालिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. त्या वेळी ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी हरभजन सिंगशी माझी स्पर्धा होती. मी तिशीत असल्यामुळे निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या खेळाडूला स्थान देऊ नये अशी सतत माझ्याविषयी टिप्पणी केली जात होती. अ‍ॅडलेड येथील कसोटीत मला स्थान मिळाले आणि संघाच्या विजयात मी महत्त्वपूर्ण वाटा उचलला, याचा मला खूप आनंद झाला होता. मी त्या वेळी एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली होती. ही कामगिरी करताना मी वेगळय़ा प्रकारच्या गुगली गोलंदाजीवर भर दिला होता.’’

भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संस्मरणीय क्षण कोणता, असे विचारले असता कुंबळे म्हणाले, ‘‘१९८३च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपद व २००१मध्ये ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा हे सर्वोत्तम क्षण आहेत. १९८३चा विश्वचषक आपण जिंकला त्या वेळी मी भारतीय संघात नव्हतो, मात्र त्या अजिंक्यपदामुळे भारताला नावलौकिक मिळाला आणि भारतीय क्रिकेटला उभारी आली. २००१मधील मालिकेत भारताने पिछाडीवरून ऑस्ट्रेलियाला २-१ असे हरवले होते. त्या वेळी मला दुखापतीमुळे भाग घेता आला नव्हता. परंतु आपल्या खेळाडूंनी बलाढय़ कांगारूंना नमवले होते, ही निश्चितच मोठी कामगिरी होती.’’