ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. त्यामुळे भविष्यात ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार करण्याच्या हेतूने मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा घाट महाराष्ट्रात बांधला गेला. पण महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे आयोजित केली जाणारी मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा इतिहासजमा होणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. दर वर्षी ही स्पर्धा आयोजित केली जावी, अशी संकल्पना होती. मात्र विविध कारणास्तव स्पर्धेच्या संयोजनात खंड पडला आहे. ही स्पर्धा नियमित घेतली पाहिजे, तसेच या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी महाराष्ट्रातून खेळाडू घडविले पाहिजेत. मल्लखांब, जिम्नॅस्टिक्ससारख्या पायाभूत खेळांनाही प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत ‘चर्चेच्या मैदानावरून’मध्ये मान्यवरांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्राची कामगिरी अव्वल दर्जाची व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करणे अपेक्षित आहे. त्यासाठी दर वर्षी स्पर्धेचा कालावधी आधीच निश्चित केला पाहिजे. विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा साधारणपणे नोव्हेंबरपासून सुरू होतात. या स्पर्धापूर्वी राज्य मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली तर निश्चितपणे त्यामधून महाराष्ट्राचे संघ निवडले जातील. या स्पर्धेतील सांघिक विभागात पहिल्या आठ मानांकित संघांनाच प्रवेश दिला पाहिजे त्यामुळे स्पर्धा कमी खर्चात व कमी वेळेत आयोजित करणे शक्य होईल. वैयक्तिक खेळांमध्ये पहिले सहा किंवा आठ मानांकित खेळाडूंना संधी दिली पाहिजे. तसेच अशा स्पर्धामधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी चांगले खेळाडू घडविले पाहिजेत.
– चंद्रकांत शिरोळे
रोईंगचे आंतरराष्ट्रीय संघटक
वरिष्ठ गटातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा न घेता १४ ते १६ वर्षे वयोगटातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित केली पाहिजे. त्यामुळे अशा स्पर्धेतून भविष्यात ऑलिम्पिककरिता महाराष्ट्राचे अव्वल दर्जाचे खेळाडू घडू शकतील. ऑलिम्पिकप्रमाणेच राष्ट्रकुल क्रीडा व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असणारे खेळाडू मिनी ऑलिम्पिकमधून तयार केले पाहिजेत. अशा स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण व स्पर्धात्मक सरावाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. गुणवान खेळाडूंवर शासनही मिशन ऑलिम्पिक योजनेद्वारे आर्थिक मदत करू शकतील. तसेच विविध खेळांच्या संघटनांनाही नैपुण्य शोध व विकास कार्यक्रम राबविणे सोपे जाईल.
– सुंदर अय्यर
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य
राज्यातील खेळाडूंचा विकास होण्यासाठी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आवश्यकच आहे. मात्र ही स्पर्धा दर वर्षी घेणे महत्त्वाचे आहे. राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यामध्ये प्राधान्य दिले पाहिजे. मलखांब व जिम्नॅस्टिक्स हे खेळ पायाभूत क्रीडा प्रकार मानले जातात. मात्र या खेळांकडे अपेक्षेइतके लक्ष दिले जात नाही. जिम्नॅस्टिक्स हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असूनही त्याला आपल्या देशात महत्त्व मिळू शकले नाही. मलखांब व जिम्नॅस्टिक्स यासारख्या उपेक्षित परंतु विलोभनीय खेळांची दरवर्षी मिनी ऑलिम्पिक घेतलीच पाहिजे. या स्पर्धामधून गुणवान खेळाडूंची निवड करून त्यांना परदेशी प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण मिळाले, तर असे खेळाडू भारताचा नावलौकिक उंचावतील.
– धनंजय दामले
मल्लखांब व जिम्नॅस्टिक्स संघटक