अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबीला अफगाणिस्तानने आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाचा कर्णधार बनवले आहे. राशिद खानने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर अफगाणिस्तानने नबीला त्याच्या जागी नियुक्त केले. यूएई आणि ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ घोषित करताना आपली संमती घेतली नसल्याचा दावा राशिदने केला होता. राशिदने सोशल मीडियावर एक संदेश लिहून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात खूप गोंधळ उडाला आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फो मधील एका अहवालानुसार, यापूर्वी अफगाणिस्तानचे कर्णधारपद भूषवलेला मोहम्मद नबी आता संघाचे नेतृत्व करतील. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) संघाची घोषणा केली. घोषणेच्या काही मिनिटांनंतर, राशिदने आपला राजीनामा दिला.
राशिद खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले, “कर्णधार आणि राष्ट्रासाठी जबाबदार व्यक्ती म्हणून मला संघ निवडीचा भाग होण्याचा अधिकार आहे. निवड समिती आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) जाहीर केलेल्या संघासाठी माझी संमती घेतली नाही.”

 

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने संघ निवडण्याआधी कर्णधार राशिद खानचा सल्ला घेतला नसला तरी त्यांनी उत्तम खेळाडूंचा सहभाग असणारा संघ टी २० विश्वचषकसाठी निवडला आहे. संघामध्ये ६ गोलंदाज, ४ अष्टपैलू खेळाडू आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने दोन राखीव खेळाडू ठेवले आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तानचा संघ

राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह झाझाई, उस्मान गनी, असगर अफगाण, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जानत, गुलबदीन नायब, नवीन उल हक, हमीद हसन, दौलत जदलान शरफुद्दीन अशरफ, शापूर झाद्रान, कैस अहमद.

राखीव खेळाडू: अफसर झाझाई, फरीद अहमद मलिक.