India vs England, Mohammed Siraj Celebration: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंघमहॅमच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २७१ धावांवर आटोपला .यासह भारतीय संघाने हा सामना ३३६ धावांनी आपल्या नावावर केला.
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ६०८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचे ३ प्रमुख फलंदाज चौथ्या दिवशी माघारी परतले. त्यामुळे सामन्यातील शेवटच्या दिवशी भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ७ गडी बाद करायचे होते. तर इंग्लंडला धावांचा डोंगर सर करायचा होता. दरम्यान सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध कृष्णाला या सामन्यातील पहिली विकेट मिळाली. प्रसिद्ध कृष्णाने ख्रिस वोक्सला बाद करत माघारी धाडलं. दरम्यान वोक्सचा झेल घेतल्यानंतर मोहम्मद सिराजने दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, इंग्लंडचा संघ धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाकडून ५३ वे षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू प्रसिद्धने बाऊंसर टाकला. जो ख्रिस वोक्सला कळालात नाही. हा चेंडू बॅटची कडा घेत उंच हवेत गेला. त्यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोहम्मद सिराजने सोपा झेल घेतला आणि ख्रिस वोक्स ३२ चेंडूत ७ धावांची खेळी करत माघारी परतला. दरम्यान हा झेल पकडताच सिराजने दोन्ही झेल आकाशाच्या दिशेने केले आणि भन्नाट सेलिब्रेशन केलं.
भारतीय संघाने इंग्लंडसमोर ठेवलं ६०८ धावांचं आव्हान
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ५८७ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक २६९ धावांची खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ४२७ धावा करत डाव घोषित केला. यासह इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं डोंगराइतकं आव्हान ठेवलं.