Mohsin Naqvi Apologies BCCI For Asia Cup Trophy Controversy: भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या गोंधळाबद्दल पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माफी मागितली आहे. अशिया चषकातील अंतिम सामन्यानंतर झालेल्या गोंधळाबाबत, आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत मोहसीन नक्वी यांनी मृदू स्वर स्वीकारला होता.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयकडे दिलगिरी व्यक्त केली आणि मान्य केले की अंतिम सामन्यानंतर परिस्थिती इतकी बिकट व्हायला नको होती.

अंतिम सामन्यातील गोंधळ

अंतिम सामन्याच्या दिवशी, भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्याकडून थेट ट्रॉफी आणि पदके स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, दुसरीकडे मोहसीन नक्वी ट्रॉफी त्यांच्या हस्तेच वितरित करण्यावर ठाम होते. मात्र, भारतीय संघाने आपली भूमिका कायम ठेवल्यानंतर मोहसीन नक्वी यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांना ट्रॉफी आणि पदके मैदानावरून बाहेर घेऊन जाण्याचे निर्देश दिले होते.

एसीसीच्या बैठकीत बीसीसीआय आक्रमक

मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत, बीसीसीआयने ट्रॉफी वादात मोहसीन नक्वी यांच्या वर्तनाचा निषेध केला. बैठकीत सहभागी झालेले बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अधोरेखित केले की, आशिया चषक ट्रॉफी पीसीबी प्रमुखांची नाही तर एसीसीची आहे. योग्यरित्या हस्तांतरित न करता ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत नेल्याबद्दल त्यांनी मोहसीन नक्वींवर टीका केली.

यावेळी राजीव शुक्ला यांनी आग्रह धरला की, ही ट्रॉफी अधिकृतपणे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील विजेत्या भारतीय संघाकडे सोपवावी.

मोहसीन नक्वींचा आडमुठेपणा कायम

बीसीसीआयची माफी मागितल्यानंतरही, मोहसीन नक्वी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी भारतीय संघाला ट्रॉफी परत करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, जर भारतीय संघाला ट्रॉफी हवी असेल तर कर्णधार सूर्यकुमार यादवने ती घेण्यासाठी दुबईतील एसीसी कार्यालयात जावे. मात्र, बीसीसीआयने मोहसीन नक्वी यांची भूमिका फेटाळून लावली. भारतीय कर्णधाराने ट्रॉफी घेण्यासाठी दुबईला का जावे लागले असा प्रश्नही उपस्थित केला.