Muhammad Waseem Breaks Rohit Sharma Record: अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि युएई या तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना अफगाणिस्तान आणि युएई या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने ३८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात फलंदाजी करताना युएईच्या फलंदाजाने रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

वसीमने मोडला रोहित शर्माचा विक्रम

या सामन्यात युएईचा कर्णधार मोहम्मद वसीमने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ३७ चेंडूंचा सामना करत ६७ धावांची तुफान खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकार खेचले. हे ६ षटकार विक्रमी ठरले आहेत. या धावा त्याने १८१ च्या स्ट्राईक रेटने केल्या. ६ षटकारांसह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार ठरला आहे. या विक्रमात त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडून काढला आहे. त्याच्या नावे आता ११० षटकारांची नोंद झाली आहे. तर रोहित शर्माच्या नावे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०५ षटकार मारण्याची नोंद आहे.

रोहित शर्माच्या नावे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १०५ षटकार मारण्याची नोंद आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदाचा मान मिळवला होता. या स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर रोहित शर्माने टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोहम्मद वसीमकडे या विक्रमात आणखी मोठी झेप घेण्याची संधी असणार आहे.

अफगाणिस्तानचा दमदार विजय

तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळताना अफगाणिस्तानने दमदार विजयाची नोंद केली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानने २० षटकाअखेर ४ गडी बाद १८८ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताा इब्राहिम जादरानने ४० चेंडूंचा सामना करत ६३ धावांची दमदार खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना युएईकडून मोहम्मद वसीम ६७ धावांची खेळी केली. पण ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसी नव्हती. त्यामुळे युएईला हा सामना ३८ धावांनी गमवावा लागला.