रणजी हंगामाची अडखळत सुरुवात करणाऱ्या मुंबई संघाने घरच्या मैदानावर मध्य प्रदेशविरुद्ध दिमाखदार सुरुवात केली. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३७५ धावा केल्या आहेत.
मध्य प्रदेशन नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा मध्य प्रदेशचा निर्णय चुकला. आदित्य तरे आणि अखिल हेरवाडकरने ९३ धावांची सलामी दिली. पुनीत दातेयने आदित्यला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३७ धावा केल्या. मागच्या लढतीत शतक झळकावणारा श्रेयस अय्यर केवळ ४ धावा काढून तंबूत परतला. मात्र यानंतर अखिल-सूर्यकुमार जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. शतकाकडे कूच करणाऱ्या अखिलला अंकित शर्माने बाद केले. अखिलचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. १५ चौकार आणि एका षटकारासह अखिलने ९७ धावा केल्या. अखिलच्या जागी आलेल्या सिद्धेशने सूर्यकुमारला चांगली साथ देत चौथ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. यादरम्यान सूर्यकुमारने आपले शतक पूर्ण केले. दीडशतकाकडे कूच करणाऱ्या सूर्यकुमारला हरप्रीत सिंगने त्रिफळाचीत केले. सूर्यकुमारने २२ चौकार आणि एका षटकारासह १३५ धावांची खेळी साकारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिद्धेश लाड ६९ तर सर्फराझ खान २० धावांवर खेळत होते. मध्य प्रदेशतर्फे पुनीत दातेयने २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ४ बाद ३७५ (सूर्यकुमार यादव १३५, अखिल हेरवाडकर ९७, सिद्धेश लाड ६९, पुनीत दातेय २/६२) विरुद्ध मध्य प्रदेश
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘सूर्य’कुमार तळपला
रणजी हंगामाची अडखळत सुरुवात करणाऱ्या मुंबई संघाने घरच्या मैदानावर मध्य प्रदेशविरुद्ध दिमाखदार सुरुवात केली.

First published on: 06-01-2015 at 12:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai energetic start against madhya pradesh in ranji trophy