करवीरनगरीत अस्सल मातीतला कबड्डीचा थरार पाहण्याची संधी क्रीडारसिकांना साखळी सामन्यांच्या अखेरच्या दिवशी लाभली. मुंबई शहरच्या पुरुष संघाने कमाल करीत छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेची उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. नागपूर आणि जालन्याला पराभूत करणाऱ्या मुंबईने गुरुवारी मुंबई उपनगरचा ४-२ असा रंगतदार लढतीत पराभव करून गटविजेत्याच्या थाटात आपले बाद फेरीतील स्थान पक्के केले. मुंबईच्या महिला संघानेही सिंधुदुर्ग आणि नागपूरनंतर गुरुवारी रत्नागिरीच्या संघाला सहज हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय ठाण्याच्या महिला संघाने शेवटच्या साखळी सामन्यात यजमान कोल्हापूरला नमवून उपांत्य फेरी गाठली.
पुरुषांमध्ये मुंबई शहर विरुद्ध उपनगर यांच्यातील सामना प्रारंभीपासून रंगतदार ठरला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना आपले खाते उघडण्यात अपयश आले. पण दुसऱ्या सत्रात मुंबईच्या गौरव शेट्टीची उपनगरच्या क्षेत्ररक्षकांनी पकड केली. मग मुंबईच्या श्री भारतीने बोनस गुण घेत बरोबरी साधली. त्यानंतर विशाल मानेने आपल्या पोलादी पकडीच्या साहाय्याने मुंबईला आघाडी मिळवून दिली. मग उपनगरच्या महेश डोइफोडेची पकड करीत मुंबईने आघाडी वाढवली आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंबईच्या महिला संघाने रत्नागिरीला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही आणि २७-७ अशा गुणफरकाने आपला तिसरा विजय साजरा केला. सुवर्णा बारटक्के आणि भक्ती इंदुलकर यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. रत्नागिरीकडून गौरी कदमने एकाकी झुंज दिली. याशिवाय अद्वैता मांगले आणि सपना साखळकर यांच्या लाजवाब खेळाच्या बळावर ठाण्याने कोल्हापूरचा २०-१६ अशा फरकाने पराभव केला. पराभूत संघाकडून शर्वरी शेलार आणि शुभदा माने छान खेळल्या.

कोल्हापूरकरांना धर्मेद्रने जिंकले!
रुपेरी पडद्यावर एक काळ अधिराज्य गाजविणारा अभिनेता धर्मेद्रच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले. ‘‘कोल्हापूरनगरी को में ‘आखाडीनगरी’ के नाम से जानता हूं. मै भी कुश्ती और कबड्डी खेलता था..’’ या वाक्यांनी धर्मेद्रने कोल्हापूरकरांची काही मिनिटांतच मने जिंकली. त्याने मैदानावर जाऊन खेळाडूंशीही सुसंवाद साधला आणि आपल्या आठवणी ताज्या केल्या.

मुंबईच्या मुलींचे महालक्ष्मीला साकडे
मुंबई शहरच्या मुलींचा संघ या स्पध्रेसाठी कोल्हापूरला आल्यापासून दररोज महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत आहे. छत्रपती शिवाजी करंडक मुंबईला मिळू दे आणि दुबईवारी घडू दे तसेच सामनावीराची स्कुटी मिळू दे.. अशा प्रकारचे साकडे या मुली देवीला घालत आहे. पण या मागचे आणखी एक कारण म्हणजे मुंबई संघाच्या व्यवस्थापिका विजया दिवेकर यांची देवावर अतिशय श्रद्धा आहे. त्यामुळे त्या दररोज मुलींना जवळच असलेल्या प्रसिद्ध महालक्ष्मी देवीच्या मंदिरात न चुकता नेतात.