ऑलिम्पिक खेळांचे महत्त्व मुख्य संघटकांना कळावे व भारतीय ऑलिम्पिक महासंघात (आयओए) अध्यक्षीय स्तरावर असलेली निष्क्रियता दूर करण्यासाठीच अनेक खेळांच्या राष्ट्रीय संघटनांनी आयओएचे अध्यक्ष एम. रामचंद्रन यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्याचे ठरविले आहे, असे ‘आयओए’वर असलेले महाराष्ट्राचे युवा सदस्य नामदेव शिरगांवकर यांनी सांगितले.
शिरगांवकर हे भारतीय मॉडर्न पेन्टॅथलॉन संघटनेचे सरचिटणीस आहेत. त्यांनी तलवारबाजी या खेळात जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रामचंद्रन यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी आयओएची विशेष सर्वसाधारण सभा त्वरित आयोजित केली जावी, अशी मागणी हॉकी इंडिया, झारखंड ऑलिम्पिक संघटना यांच्यासह काही संघटनांनी केली आहे. त्यास मॉडर्न पेन्टॅथलॉनच्या राष्ट्रीय संघटनेने पाठिंबा दिला आहे.
याबाबत शिरगांवकर यांनी सांगितले की, ‘‘आमचा खेळ ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असला तरीही आयओएकडून आमच्या खेळाकडे दुर्लक्ष झाले आहे. केवळ आमचा खेळ नव्हे, तर अन्य काही ऑलिम्पिक खेळांकडे आयओएकडून लक्ष देण्यात आलेले नाही. विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांकडून आयओएकडे चांगल्या योजनांबाबत मागणी केली जाते, मात्र अनेक वेळा या संघटनांना आयओएच्या अध्यक्षांकडून उत्तरेच मिळत नाहीत.’’
अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅच यांनी भारताला भेट दिली होती. या संदर्भात शिरगांवकर यांनी सांगितले की, ‘‘बॅच यांची भेट खूप दिवसांपूर्वीच निश्चित झाली होती, मात्र आयओएने या भेटीपूर्वी केवळ तीन दिवस अगोदर आम्हा सदस्यांना निमंत्रणे पाठविली. त्यामुळे काही सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत. बॅच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. जर रामचंद्रन यांनी या भेटीपूर्वी आयओएची सभा घेऊन चांगल्या योजनांबाबत विचारविनिमय केला असता तर मोदी हे बॅच यांच्यापुढे काही ठोस योजना ठेवू शकले असते. बॅच यांनी भारताकडे ऑलिम्पिक आयोजित करण्याची क्षमता असल्याचे सांगितले होते मात्र याबाबत आयओएकडून सविस्तर मसुदा मोदी यांच्याकडे दिला गेला नाही. बॅच यांनी आयओएच्या सदस्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत वरिष्ठ संघटकांबरोबर युवा संघटकांना बोलण्याची संधी देण्याची आवश्यकता होती. मात्र अशी संधी न दिल्यामुळे बॅच यांच्या भेटीचा अपेक्षेइतका फायदा झाला नाही. बॅच यांचा माझ्याशी परिचय आहे. माझ्यासारख्या युवा खेळाडूंचा उपयोग आयओएने केला पाहिजे, असे बॅच यांनी रामचंद्रन यांना सुचविलेही.’’
ऑलिम्पिक चळवळीत युवा संघटक व खेळाडूंचा अधिकाधिक सहभाग असला पाहिजे, असे बॅच यांच्याकडून सातत्याने सांगितले जाते. मात्र आयओएमध्ये युवा संघटकांना अपेक्षेइतकी संधी दिली जात नाही. ऑलिम्पिक चळवळीच्या विकासाकरिता आम्ही सदैव उत्सुक असतो, असे सांगून शिरगांवकर म्हणाले, ‘‘२०२८ ची ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची क्षमता आपल्या देशाकडे आहे. जर या स्पर्धेचे संयोजनपद मिळाले तर ते आयओएला मिळणार आहे. हे लक्षात घेऊन रामचंद्रन यांनी पुढाकार घेऊन त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची व तो ठराव मोदी यांच्यापुढे ठेवला असता तर बॅच यांच्याशी मोदी याबाबत चर्चा करू शकले असते.’’
मॉडर्न पेन्टॅथलॉनच्या जागतिक संघटनेतर्फे आयोजित केलेली परिषद दोन दिवस पूर्ण वेळ चालते व त्यामध्ये खेळाचे मार्केटिंग, क्रीडा सुविधा, खेळाडूंच्या मागण्या आदीबाबत सखोल विचारविनिमय केला जातो. मात्र गतवर्षी चेन्नई येथे झालेली आयओएची सभा केवळ एक दोन तासांत गुंडाळली गेली. माझ्यासह अनेक सदस्य काही चांगल्या सूचना करण्यासाठी उत्सुक असतात, मात्र आम्हाला अपेक्षेइतकी संधी दिली जात नाही असेही शिरगांवकर यांनी सांगितले.
मिलिंद ढमढेरे, पुणे
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2015 रोजी प्रकाशित
ऑलिम्पिकचे महत्त्व पटवून देण्यासाठीच बंडाचा झेंडा – शिरगांवकर
ऑलिम्पिक खेळांचे महत्त्व मुख्य संघटकांना कळावे व भारतीय ऑलिम्पिक महासंघात (आयओए) अध्यक्षीय स्तरावर असलेली निष्क्रियता दूर

First published on: 07-05-2015 at 12:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namdev shirgaonkar major difference with ioa chief ramachandran