पाचव्या राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धेस ३० मे रोजी येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरूवात होत असून उद्घाटन राष्ट्रीय इनडोअर हॉकी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, राज्य अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कार्याध्यक्ष सचिन महाजन आदींच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातील २८ राज्यांचे संघ नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
३० मे ते एक जून या कालावधीत पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलच्या इनडोअर स्डेटियममध्ये ही स्पर्धा होणार आहे. या खेळाची विश्वचषक स्पर्धाही होत असते. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेतही या खेळाला स्थान आहे. त्यामुळे केंद्र स्तरावर भारतीय शालेय क्रीडा परिषदेने या खेळाला शालेय क्रीडा प्रकारात स्थान द्यावे अशी मागणी करण्याचा प्रस्ताव यंदा संघटनेने तयार केला असल्याची माहिती राज्य अध्यक्ष डॉ. धर्माधिकारी यांनी दिली. यंदा आटय़ापाटय़ा, दोरीवरच्या उडय़ा, कराटे अशा सुमारे दहा नव्या खेळांना या समितीने मान्यता दिली असून इनडोअर हॉकी या खेळाचा समावेश क्रीडा प्रकारात झाल्यास भारतीय खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहचू शकतील असा विश्वास डॉ. धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.
१९५० मध्ये या खेळाला युरोप खंडात सुरूवात झाली आहे. २००४, २००७, २०११ या वर्षी या खेळाच्या विश्वचषक स्पर्धा झाल्या आहेत. देशभरातून या खेळासाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या संघांच्या लढती सोडतीव्दारे निश्चित केल्या जाणार आहेत. शुक्रवारी सकाळी स्पर्धेला सुरूवात होणार असली तरी औपचारिक उद्घाटन सायंकाळी पाच वाजता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत सुमारे ७०० पुरूष आणि महिला सहभागी होणार आहेत. विविध राज्यातून आलेल्या क्रीडा संघांचे सचिव, प्रशिक्षक संघ व्यवस्थापक नाशिकमध्ये दाखल झाले असून क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.