मंगळवारच्या सकाळी फोन उघडला. इन्स्टाग्रामवर गेलो आणि नील वॅगनरचा अश्रूभरल्या डोळ्यांचा फोटो समोर आला. काही मिनिटांपूर्वीच त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. मी आता खेळणं थांबवतोय हे सांगताना त्यांचा आवंढा दाटून आला. त्याने पुढचं वाक्य कसंबसं रेटलं. त्याच्याही नकळत अश्रू बांध फोडून वाहू लागले होते. तुम्हाला वाटेल कोण हा वॅगनर? ऐतिहासिक कोणी आहे का? ग्रेट-लिजंड या मांदियाळीत मोडतो का? सार्वकालीन महान आहे का? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाही असं आहे. कोणतीही व्यवस्था उभी राहायला, बहरायला सच्चे शिपाई लागतात. कुरापती काढत बसणाऱ्यांपेक्षा तनमनधन अर्पणारे योद्धे लागतात. वॅगनर हा मूर्तीमंत योद्धा होता, आहे आणि राहील. इतिहासातल्या अनेक गोष्टीत शिलेदारांच्या जाणत्या राजाप्रति निष्ठेचं यथार्थ वर्णन आपण ऐकलंय. वॅगनर हा आधुनिक काळातला निष्ठावान शिलेदार होता. न्यूझीलंड संघाप्रति त्याचं इमान होतं. शेवटच्या मॅचपर्यंत त्याने या इमानासाठी सर्वस्व ओतलं. वॅगनर असणं म्हणजे सळसळत्या चैतन्याची अनुभूती होती. एरव्ही संघासाठी जीवाचं रान करणाऱ्या कडव्या वॅगनरची हळवी बाजू आज जगाने पाहिली. हजारो लोक क्रिकेट खेळतात. येतात-जातात. मोजके खेळाडू महान होतात. फारच कमी खेळाडूंची छाप खेळावर उमटते. वॅगनरची छाप उमटली म्हणूनच त्याच्या निवृत्तीची दखल घेणं आवश्यक.

डावखुरा वेगवान गोलंदाज ही वॅगनरची प्राथमिक ओळख. जन्म आफ्रिकेतला. त्यामुळे फास्ट बॉलर होण्याचं स्वप्न बाळगणं साहजिक. आफ्रिकेतच फास्ट बॉलिंगचे बारकावे घोटून घेतले. आफ्रिकेत संधी मिळेलच याची खात्री नसल्यामुळे वॅगनरने थेट न्यूझीलंड गाठलं. बोचऱ्या वाऱ्यांसाठी प्रसिद्ध निसर्गरम्य ड्युनेडिन हे वॅगनरचं नवं घर झालं. उंची बेताची आणि शरीरयष्टी स्थूल अशी. वेगवान गोलंदाजाला आवश्यक दोन्ही गोष्टी वॅगनरकडे नव्हत्या. प्रचंड वेगाचीही देणगी नाही. म्हणजे अवघडच विषय सगळा. पण वॅगनरच्या धमन्यात फास्ट बॉलिंग होतं आणि काळीज सिंहाचं होतं. न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघासाठी पात्र ठरण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी जावा लागतो. या काळात वॅगनरने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपलं नैपुण्य सिद्ध केलं.

डाव्या खांद्याचा पुरेपूर वापर करत प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या छातीचा वेध घेईल असा बाऊन्सर वॅगनरचं प्रमुख अस्त्र. अशा बाऊन्सर्सचा मारा करताना वॅगनर थकत नाही, कंटाळत नाही. क्रिकेटच्या परिभाषेत बाऊन्स्ड आऊट अशी संकल्पना नाही. पण वॅगनर अक्षरक्ष: भेदक बाऊन्सर टाकून फलंदाजांना माघारी धाडे. दोन किलोमीटर धावत येऊन लेगसाईडला फलंदाजापासून कोसो दूर बाऊन्सर टाकून तो चौकार जाणार असे गोलंदाज बरेच आले आणि गायबही झाले. वॅगनरचे बाऊन्सर अणुकुचीदार असतात. युद्धात भाले कसे शरीराचा वेध घेतात तसं वॅगनरचे बाऊन्सर यष्ट्यांचा वेध घेत. बाऊन्सरच्या वाटेत आलात तर तुमच्या शरीरावर घाव उमटणं साहजिक. हे बाऊन्सर टाकताना वॅगनरच्या मनात खुनशीपणा नसे. फलंदाजाला जायबंदीच करतो असा असुरी विचार वॅगनरच्या मनाला शिवला नाही. बाऊन्सर हे त्याचं शस्त्र होतं. श्रद्धेय भावनेने तो हे शस्त्र परजत असे. काम झालं की शस्त्र बाजूला ठेऊन घाऱ्या निळ्या डोळ्यांनी मिश्कील हसणारा वॅगनर भेटत असे. त्याने फलंदाजाला शत्रू मानलं नाही. शेरास सव्वाशेर फलंदाजाने चांगली खेळी केली की वॅगनर मनापासून कौतुक करत असे. मुळातच न्यूझीलंडचा संघ खऱ्या अर्थाने जंटलमन. चिंधी गोष्टी ते करत नाहीत. वॅगनरने ही परंपरा कसोशीने जपली.

युट्यूबवर नील वॅगनर टाकलंत तर त्याची आणि स्टीव्हन स्मिथ-मॅथ्यू वेडची जुगलबंदी दाखवणारा व्हीडिओ समोर येतो. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड म्हणजे ट्रान्स टास्मानियन प्रतिस्पर्धी. हाडवैर. सर्वसाधारणपणे ऑस्ट्रेलियाचीच सरशी होते पण न्यूझीलंड सहजी सोडत नाही. स्टीव्हन स्मिथ तेव्हा ऐन भरात होता. तो धावांची टांकसाळच उघडून होता. त्याला बाद करणं, त्याची एकाग्रता तोडणं कठीण होतं. वॅगनरने स्मिथच्या तंत्राचा अभ्यास केला. स्मिथ तुडतुड अशा अनाकर्षक पद्धतीने खेळतो हे वॅगनरने जाणलं. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन लेगसाईडला फटके मारतो हे त्याच्या लक्षात आलं. वॅगनरने स्मिथसाठी सापळा रचला. लेगसाईडला सहा विविध ठिकाणी माणसं उभी केली. स्मिथवर बाऊन्सरचा भडिमार केला. स्मिथही पुरुन उरला. त्याने त्यातूनही चौकार लगावले. वॅगनरने न थकता बाऊन्सरचा मारा केला. अखेर स्मिथ जाळ्यात सापडला. स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेग यांच्या मध्यात उभ्या केलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपताच वॅगनरने आरोळी ठोकली. त्याच तासाभरात वॅगनरने मॅथ्यू वेडवर क्षेपणास्त्रांसारखे बाऊन्सर सोडले. नजराजनर झाली, जळते कटाक्ष टाकले गेले. वाग्बाण निघाले. काही विचारू नका. क्रिकेटमधलं काहीही कळतं नसलं तरी हा व्हीडिओ तुम्ही पाहायलाच हवा.

क्रिकेटमध्ये पार्टनरशिप हा महत्त्वाचा विषय. तुम्ही एकटे भारी खेळून काहीच उपयोग होत नाही. न्यूझीलंडकडे पेस बॅटरी म्हणजे दर्जेदार गोलंदाजांची फौज तयारच असते. २०१० ते २०२० आणि आतापर्यंत अशा १५ वर्षात न्यूझीलंडची कसोटीत कामगिरी चांगली झाली. त्यापैकी एक कारण म्हणजे त्रिकुट. टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट आणि नील वॅगनर या त्रिकुटामुळे प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडत असे. मॅच न्यूझीलंडमध्ये असेल तर बघायलाच नको. साऊदी आणि बोल्ट नवा चेंडू हाताळत. वॅगनर फर्स्ट चेंज म्हणून येत असे. या तिघांना एकत्र खेळताना पाहणं हा एक सुरेख अनुभव असे. प्रत्येकाची ताकद निरनिराळी. शस्त्रं वेगवेगळी. पण उद्दिष्ट एकच- कमीत कमी धावा देत प्रतिस्पर्ध्यांच्या डावाला खिंडार पाडणे. साऊदी-बोल्ट हे पाया रचत. वॅगनर येऊन त्यावर वास्तू उभारत असे. अनेकदा या त्रिकुटामुळे न्यूझीलंडला फिरकीपटूला गोलंदाजीच द्यावी लागत नसे.

फास्ट बॉलर दमतात, त्यांना दुखापतीची शक्यता असते. वॅगनर थकत बिकत नाही. दिवसातलं शेवटचं षटकही तो तितक्याच तडफेने टाकत असे. मरगळलेलं त्याला कधीच पाहिलं नाही. जितक्या त्वेषाने गोलंदाजी करणार तितकंच झोकून देऊन क्षेत्ररक्षण करणार. मैदानात कुठेही उभं करा-कार्यकर्ता सज्ज. न्यूझीलंडमध्ये कसोटी सुरू होती. सामना न्यूझीलंड जिंकणार हे जवळपास स्पष्ट होतं. त्या स्थितीतही वॅगनरने एक धाव वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. बरं हे करुन जागेवर परतताना त्याच्या चेहऱ्यावर निखळ हास्य होतं. वॅगनर आहे म्हणजे १०० टक्के निष्ठेची हमी. सलग कितीही षटकं टाकेल. अफलातून क्षेत्ररक्षण करेल. कर्णधाराला चिंताच नाही. खेळपट्टीचा नूर ओळखून संघ निवडला जातो. आशियाई उपखंडात वॅगनरला अंतिम अकरात घेतलं जात नसे. कारण फिरकीपटूंना प्राधान्य मिळत असे. एनर्जी ड्रिंक्स झटपट पोहोचवण्यात वॅगनर पटाईत. न्यूझीलंडकडे स्टारडमवाले फारच कमी खेळाडू आहेत. पण त्यांच्याकडे असे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. कामाशी तादात्म्य पावणे ही संकल्पना कपोकल्पित वाटावी असं हल्ली वाटतं. वॅगनरला मैदानात पाहिल्यावर तादात्म्य या संकल्पनेची उकल झाली. लहान मुलं लग्नाच्या हॉलमध्ये जशी बागडतात तसं वॅगनरचं मैदानात होत असे. एखाद्या दिवशी लो वगैरे वाटत असेल तर वॅगनरचा जाळ आणि धूर संगाट वाला स्पेल पाहा. आळस झटकून दुप्पट काम कराल.

क्रिकेटचा लंबक टेस्टकडून वनडेकडे आणि वनडेकडून ट्वेन्टी२० कडे वळत असतानाच्या काळात वॅगनर आला. बाऊन्सरच्या बरोबरीने बाकी अस्त्रंही त्याच्या भात्यात आहेत. त्याचा प्रत्यय तो वेळोवेळी देतो. पण वॅगनर बॅटिंग करत नाही. वॅगनरच्या नावावर एकही वनडे नाही. एकही ट्वेन्टी२० नाही. ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट मंडळींची पैदास होत असताना वॅगनरचं घराणं कसोटीवालंच राहिलं. जगात ट्वेन्टी२० लीगचं पेव फुटलं आहे. वॅगनर त्यापैकी कुठेही फिरकला नाही. साहजिकच दीड महिन्यात वर्षभराची बेगमी करुन देणाऱ्या मंचापासून तो दूरच राहिला. वॅगनरने वनडे किंवा ट्वेन्टी२० खेळायला हवं होतं का? न्यूझीलंडने त्याचा या दोन प्रकारांसाठी विचार करायला हवा होता का? रिअॅलिटी शों च्या भाऊगर्दीत पहाटे उठून शास्त्रीय संगीताचा रियाझ करणारा कोणीतरी हवाच की. पण व्यवहारिक जग एवढं सोपं नाही. एखाद्या खेळीनंतर किंवा एखाद्या स्पेलनंतर हल्ली लोक मॅव्हरिक म्हणू लागतात. अचंबित व्हायला होईल एवढा पैसा मिळतो, अमाप प्रसिद्धी मिळते. १२ वर्ष म्हणजे एक तप खेळल्यावरही वॅगनरला म्हणावी तशी प्रसिद्धी आणि श्रेय मिळालेलं नाही ही सल राहील.

१२ वर्षानंतर वॅगनरच्या नावावर ६४ कसोटीत २६० विकेट्स आहेत. डावात पाच विकेट्स घेण्याची करामत त्याने ९ वेळा केलेय. इतक्या वर्षात त्याला फक्त एकदा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला आहे. न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत वॅगनर पाचव्या स्थानी आहे. त्रिकुटातले दोन साथी साऊदी दुसऱ्या तर बोल्ट चौथ्या स्थानी आहे. वॅगनर हा आकडेवारी, सरासरीच्या पल्याड आहे.

वॅगनरने निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सराव करत होता. या मालिकेसाठी वॅगनरची निवड करण्यात आली नाही. तेव्हाच ३७वर्षांच्या वॅगनरने थांबायचं ठरवलं. संघात नसलास तरी तू आम्हाला हवा आहेस असा निरोप न्यूझीलंड संघव्यवस्थापनाने वॅगनरला धाडला. निवृत्तीची घोषणा केलेला वॅगनर सरावाची जर्सी घालून उतरला. गाठीभेटी झाल्यानंतर वॅगनरने बाऊन्सरचा मारा सुरू केला. तू इथे कसा यावर वॅगनर म्हणाला, मी आता खेळणार नाही पण संघाने मला येण्याची विनंती केली. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.

न्यूझीलंडमधली मॅच पाहायची म्हणजे ब्राह्ममुहुर्तावर उठावं लागतं. आपल्या वेळेनुसार पहाटे २.४५ वाजता मॅच सुरू होते. संत केन विल्यमसन यांच्या संघातल्या या झुंजार लढवय्यासाठी गजर लावला जात असे. झुंजूमंजू होत असताना चहा पित वॅगनरचा स्पेल पाहणं यासारखी पर्वणी नाही. वॅगनररुपी सळसळतं चैतन्य आता मैदानात दिसणार नाही. कदाचित तो अलार्मही आता लावला जाणार नाही….