क्रिकेटचे मैदान हे कायम अनिश्चित घटनांसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या सामन्यात केव्हा काय होईल याचा काहीही नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार कामगिरीमुळे गमावतो. पण नुकत्याच झालेल्या एका सामन्यात गोलंदाजाने दमदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या संघातून खेळणाऱ्या रोजमेरी मेयर या महिला क्रिकेटपटूने एका स्थानिक सामन्यात धडाकेबाज पराक्रम करून दाखवला आहे.
न्यूझीलंडची महिला गोलंदाज रोजमेरी मेयर हिने गुरुवारी एक अनोखा विक्रम नोंदवला. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या श्रीम्प्टन चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत रोजमेरीने डबल हॅटट्रिकची नोंद केली. विशेष म्हणजे आतापर्यंत अशी कामगिरी कुणालाही करता आलेली नाही. रोजमेरीने तडाखेबाज कामगिरी करत ४ षटकांमध्ये एकही धाव न देता ४ चेंडूत ४ बळी घेतले.
हॉक बे संघाचे प्रतिनिधित्व करताना रोजमेरी मेयरने १६ चेंडूत ३३ धावा केल्या. त्यामध्ये तिने दोन चौकार आणि तीन षटकार खेचले. तिने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हॉक बे संघाने प्रतिस्पर्धी संघाला २६४ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना तारानाकी संघाचे सगळे फलंदाज ५६ धावांतच माघारी परतले.
दरम्यान, न्यूझीलंडच्या २१ वर्षीय रोजमेरीने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत तिने तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत.
