Hundred League Rules: क्रिकेट हा खेळ सुरूवातीला केवळ कसोटी स्वरूपात खेळला जायचा. त्यानंतर मग क्रिकेटमध्ये क्रांती घडली आणि हा खेळ वनडे स्वरूपात खेळवला जाऊ लागला. २००५ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली. २०-२० षटकांचे सामने आणि ३ ते ४ तासात सामन्याचा निकाल. यादरम्यान क्रिकेट चाहत्यांना चौकार- षटकारांचा पाऊस आणि विकेट्सची रांग लागल्याचंही पाहायला मिळतं. आयपीएल सुरू झाल्यापासून टी-२० क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढली. मग त्यानंतर टी-२० स्पर्धेला सुरूवात झाली. आता इंग्लंडने काही वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये नवीन क्रांती घडवून आणली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ‘द हंड्रेड’ म्हणजे १०० चेंडूंची स्पर्धा सुरू केली. टी-२० सामन्यातील एका डावात १२० चेंडू फेकले जातात. मग १०० चेंडूंचं गणित कसं असतं? एक गोलंदाज किती चेंडू टाकू शकतो? जाणून घ्या.

मुळात ‘द हंड्रेड’ ही संकल्पना काय आहे, हे आधी समजून घ्या. ‘द हंड्रेड’ ही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सुरु केलेली क्रिकेट लीग स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेत दोन्ही संघांना १००-१०० चेंडू टाकण्याची संधी मिळते. द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेचे नियम काय आहेत, हे थोडक्यात समजून घ्या. द हंड्रेड आणि टी-२० क्रिकेट, या दोन्ही स्वरूपात एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे आक्रमक फलंदाजी. टी-२० क्रिकेटमध्ये २० षटकं म्हणजे १२० चेंडू फेकले जातात. तर या स्पर्धेत १०० चेंडू फेकले जातात.

काय आहेत नियम?

क्रिकेटच्या नियमानुसार गोलंदाजाने ६ चेंडू टाकले की, त्याचं एक षटक पूर्ण झाल्याचं घोषित केलं जातं. त्यानंतर दुसरा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येतो. पण या स्पर्धेचा नियम जरा वेगळा आहे. या स्पर्धेत एक गोलंदाज लागोपाठ ५ किंवा १० चेंडू टाकू शकतो. पण एका डावात त्याला २० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याची मुभा दिली जात नाही. डावातील सुरुवातीचे २५ चेंडू हे पावरप्लेचे असतील. पावरप्ले सुरू असताा केवळ २ खेळाडू हे ३० यार्ड सर्कलच्या बाहेर राहु शकतील. प्रत्येक संघाला विश्रांतीसाठी २.५ मिनिटांचा वेळ दिला जातो. यादरम्यान संघाचा मुख्य प्रशिक्षक मैदानात येऊन खेळाडूंना रणनिती आखण्यात मदत करू शकतो.

सामना बरोबरीत सुटला तर?

सामना कोणता संघ जिंकणार, हे नियम सारखेच आहेत. पण सामना बरोबरीत राहिला, तर निकाल कसा लावला जाणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर सामना बरोबरीत राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी २-२ गुण दिले जातात. तर सामना जिंकणाऱ्या संघाला ४ गुण दिले जातात. यासह काही कारणास्तव जर सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी २-२ गुण दिले जातात.